पश्चिम विदर्भात अतिवृष्टीने तिघांचा मृत्यू, ९,९१४ हेक्टरमध्ये नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:30+5:302021-07-24T04:10:30+5:30
अमरावती : पश्चिम विदर्भात ४८ तासात झालेल्या मुसळधार पावसाने १९ तालुके बाधित झाले. या आपत्तीत तिघांचा मृत्यू झाला, तर ...
अमरावती : पश्चिम विदर्भात ४८ तासात झालेल्या मुसळधार पावसाने १९ तालुके बाधित झाले. या आपत्तीत तिघांचा मृत्यू झाला, तर २,२९७ घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय ९,९१४ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
विभागात गुरुवारी सरासरी ४२ मिमी व शुक्रवारी १७ मिमी पावसाची नोंद झाली. यात संपूर्ण अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यात दोन तालुके बाधित झाले. यामध्ये ४६ घरांची पडझड झाली, तर २६३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. वाशिम जिल्ह्यात सहा तालुके बाधित झाली, यामध्ये १४ घरांचे अंशत: नुकसान व २,६७१ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे.
अकोला जिल्ह्यात पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली. २,२३७ घरांचे नुकसान तर ६,२०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. बुलडाणा जिल्ह्यात नुकसान निरंक आहे. यवतमाळ जिल्ह्यात २१ जुलैला पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. यात ४० घरांची पडझड व ७८० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. याशिवाय २२ ला पावसामुळे चार घरांची पडझड झालेली आहे.
बॉक्स
भिंत पडून एकाचा मृत्यू
बुलडाणा जिल्ह्यात घराची भिंत अंगावर कोसळल्याने देऊळगावनगर येथील ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. याशिवाय भिंगारा बीटमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. सारा येथील एका शेतातील पोलमध्ये वीज प्रवाह संचारल्याने दोन बैल दगावले व सोनार गव्हाण येथे आग लागल्याने दोन गायी दगावल्या. अकोला जिल्ह्यात अकोट येथे ४५ वर्षीय व्यक्ती पठार नदीच्या पुरात वाहून गेला.