अमरावती-नागपूर महामार्गावर कारचा भीषण अपघात, तिघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:14 AM2021-07-31T04:14:20+5:302021-07-31T04:14:20+5:30
०७ : अपघातात मृत्युमुखी पडलेले तरूण ०८ : अपघातानंतर कारची अशी अवस्था झाली. एकाचा मृतदेह झाडावर, दुसरा गाडीत, तिसरा ...
०७ : अपघातात मृत्युमुखी पडलेले तरूण
०८ : अपघातानंतर कारची अशी अवस्था झाली.
एकाचा मृतदेह झाडावर, दुसरा गाडीत, तिसरा नालीत
तिवसा (अमरावती) : वर्धा जिल्ह्यातील चिस्तूर या गावाजवळ अमरावतीहून नागपूरकडे जात असलेल्या एका कारचे नियंत्रण सुटल्याने अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील नदीच्या दरीत कार कोसळली. यात चालकासह तिघे जण ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तळेगाव श्यामजीपंतच्या चिस्तूर गावाजवळ घडली.
एमएच ३० पी ३२१४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला भीषण अपघात झाला. यात तिघे जागीच ठार झाले, तर एक जण आश्चर्यकारक बचावाला आहे. मृतांमध्ये अमित भोवते (३२, रा. बडनेरा), शुभम गारोडे (२५, रा. अमरावती), आशिष माटे (रा. राजुरा, जि. अमरावती) हे तिघे जागीच ठार झाले, तर शुभम भोयर हा सुखरूप बचावला. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यातील एकाचा मृतदेह झाडावर अडकला होता. दुसरा गाडीत अडकला होता, तर तिसरा मृतदेह बाजूला पडून होता. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा, असे सांगण्यात आले. कारण मोठे पळसाचे झाड तोडून ही गाडी उडून बाजूला फेकली असावी, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पवन भांबूरकर, जमादार राजेश साहू, सुधीर डांगे, श्याम गहाट, राहुल अमोने, अनिल चिलघर, देवेंद्र गुजर, विजय उईके, रमेश परबत यांनी मोठी कसरत करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.