तीन लाखांसाठी आईने अल्पवयीन मुलीला चढविले बोहल्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 12:56 PM2021-07-20T12:56:33+5:302021-07-20T12:57:43+5:30
Amravati News तीन लाखांसाठी आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचे अहमदाबाद येथील तरुणाशी लग्न लावून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तीन लाखांसाठी आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचे अहमदाबाद येथील तरुणाशी लग्न लावून दिले. यानंतर तीन दिवसांनी आईने तिला अमरावतीत आणले. मात्र, ती कुठेही जाऊ नये व बिंग फुटू नये म्हणून तिला आधी आसेगाव पूर्णा व नंतर अमरावतीत एका घरात डांबण्यात आले. अपहरणाच्या तक्रारीची चौकशी करीत असताना पोलिसांनी लोकेशन ट्रेस करीत तिला ताब्यात घेतल्यानंतर हा घटनाक्रम उघड झाला. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत तिचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस सूत्रांनुसार, १६ वर्षीय मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या सावत्र वडिलांनी गाडगेनगर पोलिसांकडे नोंदविली होती. तथापि, आईनेच मुलीला तुझे लग्न लावून देतो, घरदेखील देतो, असे म्हणून तिला गुजरातेतील अहमदाबाद येथे नेले. तेथे राजेश नावाच्या इसमाकडून तीन लाख रुपये घेऊन त्याच्याशी लग्न लावून देण्याचे ठरले. मात्र, यात आपण कुठेही गोवले जाऊ नये, यासाठी आईने कल्पेश नामक व्यक्तीसोबत लग्न केल्याचा बनाव केला. त्यानुसार, ती मामी बनली, तर पीडिताची ओळख भाची म्हणून करून देण्यात आली. कल्पेशला मामा बनविण्यात आले. राजेशसोबत मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर तीन लाख रुपये घेण्यात आले. लग्नानंतर दोन ते तीन दिवस अहमदाबाद येथे राहिल्यानंतर मुलीची कागदपत्रे आणायची आहेत, असे म्हणत ती मुलीला अमरावतीत परत घेऊन आली.
घरात डांबले
मुलगी घराबाहेर पडू नये, याकरिता तिच्या सावत्र वडिलाने तिला आसेगाव पूर्णा येथील एका घरात डांबून ठेवले. मात्र, मुलीने सुटका करून घेतली. ती एका ऑटोरिक्षात बसून अमरावतीला येत असताना ऑटोरिक्षाचालक असलेला सावत्र पिता वाटेत दिला. मुलीला अमरावतीला आणले. तिला आई-वडिलांनी मारहाणसुद्धा केली व खोलापुरीगेट येथे पूर्वी भाड्याने राहत असलेल्या एका महिलेच्या घरी ठेवले.
गाडगेनगर पोलिसांनी गाठले
गाडगेनगर ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार असल्यामुळे पोलिसांनी लोकेशन ट्रेस करीत सोमवारी तिला खोलापुरीगेट ठाणे हद्दीतील महाजनपुरा येथून ताब्यात घेतले. तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आईनेच पैशासाठी आपले गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे लग्न लावून दिल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रेखा लोंढे, पीएसआय राजेंद्र लेवटकर, विशाल गोरले व टीमने या घटनेचा उलगडा केला.
आपल्या आईनेच पैशांसाठी अहमदाबाद येथे लग्न लावून दिल्याचे बयाणात मुलीने सांगितले आहे. ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.
- रेखा लोंढे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर