प्रवाशांचे खिसे कापुन ऐवज चोरणारी टोळीतील तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:40 AM2020-12-17T04:40:39+5:302020-12-17T04:40:39+5:30
चांदूर रेल्वे : बसस्थानक व रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांचे खिसे कापून ऐवज चोरणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. मारडा येथील ...
चांदूर रेल्वे : बसस्थानक व रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांचे खिसे कापून ऐवज चोरणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. मारडा येथील युवकाच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी नोंदविली.
सूत्रांनुसार, ९ डिसेंबर रोजी स्वप्निल तालनकर हे चांदूर रेल्वे येथून देवगावकडे बसने प्रवास करीत असताना अज्ञातांनी त्याच्या खिशातील नगदी २७ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याअनुषंगाने पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि आशिष चौधरी व पथकातील पोलीस अंमलदार हे समांतर तपास करीत असताना १६ डिसेंबर रोजी लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालमत्ता चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना चांदूर रेल्वे बसस्थानकातील चोरी जफर नायटा व त्याच्या साथीदाराने मिळून केली असून ते अमरावती स्थित इर्विन चौकात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना इर्विन चौकातून ताब्यात घेतले. उपरोक्त गुन्हे संबंधाने सखोल चौकशी केली असता, डिसेंबरमध्येच चांदुर रेल्वे बस स्थानकात दोनदा प्रवाशांच्या खिशातुन व बॅगेतून २५ हजार व २७ हजार रुपये असा एकुण ५२ हजार रुपये चोरल्याची कबूली आरोपींनी दिली. अब्दुल जफर अब्दुल गफुर (३८), इरशाद खान अहेफाज खान (३४), मोहम्मद इरफान मोहम्मद गयास (३२, सर्व रा. अमरावती), अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून नगदी ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चांदूर रेल्वे येथील अभिलेखावर अपराध क्रमांक ३३३/२०२० कलम ३७९ भादंवि, अपराध क्रमांक ३४०/२०२० कलम ३७९ भादंविप्रमाणे नोंद असलेले गुन्हे उघडकीस आणण्यात आले. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर या अगोदर रेल्वे/ बस स्थानकात प्रवाशांचे खिसे कापून ऐवज चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक हरि बालाजी एन, अपर पोलीस अधीक्षक शाम घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या निर्देशाप्रमाणे पोउपनि आशिष चौधरी व पथक स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली.