‘तिघीं’चे सदस्यत्व ‘अनर्ह’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:45 AM2017-08-27T00:45:00+5:302017-08-27T00:45:24+5:30
विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया तीन नगरसेविकांचे सदस्यत्त्व अनर्ह (रद्द) ठरविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया तीन नगरसेविकांचे सदस्यत्त्व अनर्ह (रद्द) ठरविण्यात आले आहे. त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्दबातल झाल्याचा आदेश नगरविकास विभागाकडून या आठवड्यात येणे अपेक्षित आहे.
नागरी स्थानिक संस्थाच्या बाबतीत संबंधित सदस्यांची निवड ‘अनर्ह’ ठरविण्याची जबाबदारी नगरविकास विभागाकडे आहे. या अनुषंगाने काँग्रेसच्या शोभा शिंदे व एमआयएमच्या रुबिना तबस्सूम आणि साहेबबी कय्युम शहाँ यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत महापालिकेतील नगरसचिव विभागाने नगरविकास विभागाला पत्र पाठविले आहे.
महापालिकेत मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्याने ६ महिन्यांच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ते सादर न केल्यास त्याची निवड रद्द असल्याबाबतचे आदेश नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येतात. त्या पार्श्वभूमिवर महापालिका आयुक्तांनी तीनही नगरसेविकांचे सदस्यत्व रद्दचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविला आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महापालिकेच्या ८७ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात आला. तेथून सहा महिन्यांची मुदत २२ आॅगस्ट रोजी संपुष्टात आली.
तथापि या शेवटच्या दिनांकापर्यंतही या तीन नगरसेविका जातवैधता प्रमाणपत्र महापालिका यंत्रणेकडे सादर करू शकले नाही. त्यामुळे या तीनही नगरसेविकांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे.
असा आहे शासन निर्णय
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्याने ६ महिन्यांच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्दबातल झाली असल्याबाबतचे औपचारिक आदेश नगरविकास विभागाकडून निर्गमित करण्यात येतील, अशा सूचना २८ मार्च २०१६ च्या शासन आदेशान्वये देण्यात आल्या आहेत.