विवाहितेच्या छळप्रकरणी पतीला तीन महिन्यांचा कारावास
By Admin | Published: August 19, 2015 12:49 AM2015-08-19T00:49:22+5:302015-08-19T00:49:22+5:30
विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीला न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
अमरावती : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीला न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. नितीन अभिमान मकेश्वर असे, आरोपीचे नाव आहे.
शहरातील नितीन मकेश्वर यांचे हिंगणा येथील पूनम नावाच्या मुलीशी लग्न झाले. दारुच्या नशेत पतीने वाहन खरेदीकरिता माहेरहून पैसे आणण्याचा तकादा लावून पूनमला मारहाण करीत होता. त्याबद्दल सासू विमल मकेश्वर यांनी नितीनला सहकार्य केले. छळाला कंटाळून पूनम माहेरी गेली होती. मात्र, तिची समजूत काढून परत सासरी पाठविण्यात आले. तरीही छळ सुरु असल्याचे पाहून पूनमने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी सासू विमल मकेश्वर व पती नितीन मकेश्वर यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ४९८ (अ) व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली. पोलिसांनी ८ जून २००९ रोजी न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (५) जी.व्ही. देशपांडे यांच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता नयना इंगळे यांनी सात साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी नितीन मकेश्वरला तीन महिन्यांचा कारावास, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.