तीन महिन्यांत शौचालय बांधकामाला भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 11:08 PM2018-03-09T23:08:51+5:302018-03-09T23:08:51+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत भातकुली तालुक्यातील गावे हगणदरीमुक्तीसाठी प्रशासनाने शौचालय बांधकामाची लगीनघाई केली.
आॅनलाईन लोकमत
टाकरखेडा संभू : स्वच्छ भारत अभियानांतर्गत भातकुली तालुक्यातील गावे हगणदरीमुक्तीसाठी प्रशासनाने शौचालय बांधकामाची लगीनघाई केली. मात्र, यामध्ये लाभार्थ्यांचीच फसवणूक झाली आहे. या कंत्राटदाराकडून बांधण्यात आलेल्या शौचालयास तीन महिन्यांत भेगा पडल्याचे चित्र टाकरखेडा संभू येथे दिसून येते.
हगणदरीमुक्तीकरिता विभागीय आयुक्तांनी २६ जानेवारीची डेडलाइन दिली होती. त्यामुळे अधिकाºयांनी १०० टक्के हागणदारी मुक्त झाल्याचे दर्शविले. या घाईत शौचालय बांधकामे निकृष्ट दर्जाची झालीत. याला आता भेगा पडू लागल्या आहेत. लाभार्थ्यांकडून १२ हजार रुपयांची शासनाकडून मिळालेले अनुदान प्रशासनाच्या मध्यस्थीने कंत्राटदाराने फस्त केल्याची चर्चा आहे.
गावातील धनराज मेश्राम, बाबू येवतकर या दोन लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी शौचालय बांधून देण्यात आले. मात्र, दोन्हीही शौचालय शिकस्त झाल्याने या योजनेचे फलित काय, असा नागरिकांचा सवाल आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.