आणखी तीन एसबीआय खातेदारांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:45 PM2017-11-14T23:45:19+5:302017-11-14T23:45:37+5:30
स्टेट बँकेच्या तीन खात्यांमधून सोमवारी सायंकाळी तब्बल ४ लाख ११ हजार ५०० रुपयांची रोख परस्पर काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्टेट बँकेच्या तीन खात्यांमधून सोमवारी सायंकाळी तब्बल ४ लाख ११ हजार ५०० रुपयांची रोख परस्पर काढण्यात आली. सायबर सेलने तपासाला गती दिली असली तरी या प्रकरणातील गुन्हेगारांचा पोलिसांना अद्याप शोध लागला नाही. दरम्यान, खातेदारांनी एटीएमचा पिन क्रमांक बदलविल्यास फसवणूक थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अमरावती शहरातील स्टेट बँकेच्या २१ खातेदारांच्या खात्यातून २० लाखांवर रक्कम काढण्यात आली आहे. आणखी तीन खातेदारांना सोमवारी सायबर गुन्हेगारांनी गंडा घातला. बडनेरा ठाणे हद्दीतील दोन खातेदार असून, एक खातेदार गाडगेनगर हद्दीतील आहे.
इस्लामी चौक येथील रहिवासी मोईनोद्दीन सिराजउद्दीन हे बडनेराच्या नवी वस्ती स्थित एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या खात्यातून १ लाख ५९ हजारांची रक्कम अज्ञाताने काढल्याचे निदर्शनास आले. जहीर खान जियाउल्ला खान (२८, रा.मोमीनपुरा) हेदेखील नवी वस्ती येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. त्यांच्या खात्यातून १ लाख ६० हजारांची रक्कम परस्पर काढण्यात आल्याची तक्रार त्यांनी नोंदवली. हरियाणातील गुडगावहून ही रक्कम काढल्याचे विवरण बँकेकडून प्राप्त झाले आहे. तिसºया घटनेत शेगाव परिसरातील रहिवासी सारनाथ कोळसुजी दहीकर (५८) यांच्या एसबीआयच्या खात्यातून आॅनलाइन ९२ हजार ५०० रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
चंद्रपूरहून परतले अमरावती पोलीस
एटीएम स्किमिंग व क्लोनिंग प्रकरणात सायबर सेलचे पोलीस चंद्रपुरात चौकशीसाठी गेले होते. त्या परिसरातील घडलेल्या गुन्ह्यांची माहिती व आरोपींची छायाचित्रे पोलिसांनी घेतल्यानंतर मंगळवारी ते अमरावतीत परतले.