अमरावती जिल्ह्यात तिघांचा डोहात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:44 AM2018-10-01T09:44:55+5:302018-10-01T09:45:29+5:30
झरणेवाले बाबाच्या दर्ग्यावर दर्शनासाठी गेलेल्या अमरावतीच्या तिघांचा डोहात बुडून करुण अंत झाला. वरुड तालुक्यातील पांढरघाटीपासून मध्य प्रदेश हद्दीतील पाकनदीच्या डोहात रविवारी दुपारी ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती) : झरणेवाले बाबाच्या दर्ग्यावर दर्शनासाठी गेलेल्या अमरावतीच्या तिघांचा डोहात बुडून करुण अंत झाला. वरुड तालुक्यातील पांढरघाटीपासून मध्य प्रदेश हद्दीतील पाकनदीच्या डोहात रविवारी दुपारी ही घटना घडली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात पित्यासह मित्राचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आठनेर पोलिसांना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात यश आले.
मो. साकीर अब्दुल कदीर (४० रा. खुर्शीदपुरा, अमरावती), नितीन सुखदेव बोरकर (४२ रा. प्रभात कॉलनी, बडनेरा) आणि साकीब कदीर (५), अशी मृतांची नावे आहेत. मो. साकीर व नितीन बोरकर हे मुलाला घेऊन दुचाकीने रविवारी सकाळी ११ वाजता दर्ग्यावर गेले. पूजाअर्चा करताना मो.साकीर यांचा मुलगा साकीब डोहात पडला. त्याला वाचविण्याकरिता साकीर यांनी उडी घेतली. मात्र, पाण्याचा थांगपत्ता न लागल्याने ते पाण्यात बुडाले. त्यामुळे त्यांचे मित्र नितीन बोरकर यांनीही पाण्यात उडी घेऊन बापलेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिघांनाही जलसमाधी मिळाली.
घनदाट जंगलात असलेल्या झरणेवाले बाबा दर्ग्याजवळ ही घटना घडताना तेथे कुणीच नव्हते. परंतु आठनेर वन परिक्षेत्र विभागाचे वनरक्षक सूरज बेठे, वन कर्मचारी डी.एस. चव्हाण, धर्मेद्रसिंग चौधरी, मिश्रा हे जंगलात गस्तीवर असताना त्यांना डोहातील पाण्यावर मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती वन कर्मचाऱ्यांनी आठनेर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह बाहेर काढले. मृताच्या खिशात वाहनचालक परवाना आणि आधारकार्ड आणि काठावर एक मोबाईल आढळून आला. यावरून मृतांची ओळख पटली.