सीआर मोबाईल कार झाडावर धडकून तीन पोलीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 10:27 PM2018-05-22T22:27:15+5:302018-05-22T22:27:37+5:30
गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची सीआर-१ मोबाइल कार डुक्कर आडवे आल्याने अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला झाडाला धडकली. मंगळवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास व्यंकैयापुराजवळील महापौर बंगल्यासमोर ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची सीआर-१ मोबाइल कार डुक्कर आडवे आल्याने अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला झाडाला धडकली. मंगळवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास व्यंकैयापुराजवळील महापौर बंगल्यासमोर ही घटना घडली. अपघातात कारचालक प्रमोद भानुदास पवार (४८) यांच्यासह गोपाल श्रीकृष्ण चौरे (३२) व सागर अशोक निचळे (४०) जखमी झाले. सागर निचळे यांना गंभीर दुखापत झाली असून, तिन्ही जखमींचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलीस सूत्रानुसार, फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे सीआर-१ मोबाईल कार (एमएच२७ एए-४७५) सोमवारी मध्यरात्री विद्यापीठ रोडवर गस्त घालत होती. महापौर बंगल्यासमोरील रस्त्यावर वळण मार्गापूर्वी अचानक एक डुक्कर सीआर मोबाइल कारसमोर आले. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. या अपघातात सागर निचळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर गोपाळ चौरे यांच्या हाताचे हाड मोडले. चालक पवार किरकोळ जखमी झाले आहेत. माहितीवरून पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात व तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सागरच्या डोक्याच्या जखमेला ४० टाके बसले असून, प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. गाडगेनगर ठाणे हद्दीतील असल्याने तेथील पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे.
सीपी पोहोचले रुग्णालयात
पोलिस कारच्या अपघातात तीन पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी मंगळवारी सकाळी खासगी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची चौकशी केली.