‘ते’ तीन पॉझिटिव्ह हाथीपुऱ्यातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : येथील हाथीपुरा परिसरातील मृत कोविड-१९ पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील २४ नागरिकांना कोविड रुग्णालयात शनिवारपासून क्वारंटाइन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील हाथीपुरा परिसरातील मृत कोविड-१९ पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील २४ नागरिकांना कोविड रुग्णालयात शनिवारपासून क्वारंटाइन करण्यात आले आहे. यापैकी तिघांचे थ्रोट स्वॅब मंगळवारी उशिरा पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण बाधितांची संख्या चार झालेली आहे. त्यामुळे या भागात समूह संक्रमणाची भीती निर्माण झाली आहे.
हाथीपुरा भागातील ४५ वर्षीय व्यक्तीचा ३ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यक्तीचा थ्रोट स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या परिसरातील तीन किमी परिसर बफर झोन घोषित करण्यात येऊन बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना कोविड रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले व या सर्वांचे नमुने तपासणीसाठी नागपूरच्या ‘एम्स’ प्रयोगशाळेत शनिवारी पाठविण्यात आले. यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने क्वारंटाइन असलेल्या या बाधितांना आता पॉझिटिव्हसाठी असलेल्या कक्षात हलविण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
अहवालानंतर महापालिका व जिल्हा प्रशासनाद्वारे या भागात युद्धस्तर उपाययोजना राबविण्यात येणार आहे. महापालिकाद्वारे या भागातील हाथीपुरा, कांगारपुरा, सौदागरपुरा, तालाबपुरा, नागपुरी गेट, मौलापुरा, बोहरा गल्ली व सुफीयाननगर हे भाग कन्टोनमेन्ट घोषित केले आहे. येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत.
मृत कोरोनाग्रस्ताच्या हिस्ट्रीविषयी संभ्रम
मृत ४५ वर्षीय वाहकाच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीविषयी आरोग्य व पोलीस यंत्रणेला अद्यापही निश्चितपणे सांगता येत नाही. सध्या पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी तातडीने होणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर आता या भागात समूह संक्रमणाची भीती निर्माण झाली आहे.
पॉझिटिव्ह तिघेही एकाच कुटुंबातील
कोविड पॉझिटिव्ह आलेले तिघेही बाधित मृत कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील आहेत. यामध्ये एक महिला व दोन पुरुष असल्याची माहिती आहे. या मृताच्या संपर्कातील २४ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब नागपूरला तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी १४ नमुने निगेटिव्ह, ३ पॉझिटिव्ह आहेत, तर ७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. मृताचा स्वॅब घेणाºया डॉक्टरांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.
मृत बाधित व्यक्तींच्या संपर्कातील २४ व्यक्ती कोविड रुग्णालयात क्वारंटाईन आहेत. त्यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सोमवारी रात्री दगावलेल्या व्यक्तीचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
- शैलेश नवाल
जिल्हाधिकारी