फसवणूक प्रकरणात तिघांना तीन वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:12 AM2021-03-22T04:12:29+5:302021-03-22T04:12:29+5:30
न्यायालयाचा हातोडा टाकणे ---------------------------------------------------- अचलपूर न्यायालयात ११ वर्षांनी निकाल, लोन देण्याच्या नावावर केली होती फसवणूक वनोजा बाग (अंजनगाव ...
न्यायालयाचा हातोडा टाकणे
----------------------------------------------------
अचलपूर न्यायालयात ११ वर्षांनी निकाल, लोन देण्याच्या नावावर केली होती फसवणूक
वनोजा बाग (अंजनगाव सुर्जी) : गावोगावी फिरून नागरिकांना इन्कम टॅक्स ऑफिसकडून लोन मिळवून देण्याची बतावणी करून अनेकांची फसवणूक करणाऱ्या तीन जणांना तीन वर्षांची शिक्षा व पाच हजार रुपये दंड सुनावण्यात आला. अचलपूर न्यायालयाचे न्यायाधीश एस.टी. सहारे यांनी शनिवारी हा निकाल दिला. विशेष म्हणजे, हे फसवणूक प्रकरण ११ वर्षे चालले.
सविस्तर वृत्त असे की, अंजनगाव येथील योगेश सुरेश गोतमारे व सुरेश कृष्णराव गोतमारे तसेच शिंदी बुद्रुक येथील मो. अफसर मो. सादिक या तिघांनी शिंदी बुद्रुक गावातील १०० पेक्षा जास्त लोकांकडून त्यांना ५० हजार रुपये लोन मिळवून देतो, असे सांगून पॅन कार्डचे २००, इन्कम टॅक्स रिटर्नचे २५०० रुपये शुल्क प्रत्येकाकडून घेतले. पॅन कार्ड काढून देण्यात आल्याने अनेकांना विश्वास पटला. आपल्याला कर्ज मिळेल, या भावनेने सर्व जण वाट पाहत होते. मात्र, जसजसा वेळ निघून जात होता, तसतसे काहीच हाती लागणार नाही, हे निश्चित झाले. अंजनगाव येथे गोतमारे याच्याकडे फेऱ्या मारून अनेक जण हताश झाले, परंतु त्यांना लोन मिळाले नाही पैसे परत करण्याची मागणी धुडकावून, गोतमारे बंधूने तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, अशा धमक्याही नागरिकांना दिल्या. त्यामुळे अखेर फिर्यादी सुनील रोडे यांच्यासह ३१ जणांनी मिळून पथ्रोट पोलीस ठाण्यात १८ जून २०१० रोजी तक्रार दाखल केली. त्यावरून भादंविचे कलम ४२० व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. लगेच योगेश व सुरेश गोतमारे यांना त्यांच्या काठीपुरा येथील निवासस्थानाहून अटक करण्यात आली, तर मोहम्मद अफसर फरार झाला.
तत्कालीन ठाणेदार हिवाळे यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल अशोक वामन पवार यांनी या प्रकरणाचा तपास करून अचलपूर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. हे प्रकरण तब्बल ११ वर्षे चालले. यात अनेक साक्षीदार तपासण्यात आले सरकार पक्षातर्फे सरकारी वकील चक्रधर हाडोळे यांनी युक्तिवाद केला. सर्व साक्षीदार तपासल्यानंतर या प्रकरणात वरील तिन्ही आरोपींना दोषी ठरवून तिघांनाही तीन वर्षे शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.