प्रभात चौकातील ‘ती’ तीन दुकाने भूईसपाट; अतिक्रमण निर्मुलन पथकाची कारवाई
By प्रदीप भाकरे | Published: November 3, 2022 05:20 PM2022-11-03T17:20:32+5:302022-11-03T17:27:17+5:30
महापालिकेने 'त्या' तीनही दुकानांवर जेसीबी फिरवून संपूर्ण जागा मोकळी केली
अमरावती : व्यवस्थापकासह चार मजुरांचा नाहक बळी घेणाऱ्या राजेंद्र लॉजच्या तळमजल्यावरील तीनही दुकाने गुरूवारी जमीनदोस्त करण्यात आली. राजापेठ झोन व अतिक्रमण निर्मुलन पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. रविवारी दुपारी ती भीषण घटना घडल्यानंतर आयुक्तांनी सोमवारी लगेचच पाहणी करून खालची तीनही दुकाने खाली करून पाडण्याचे आदेश यंत्रणेला दिले होते. बरहुकूम गुरूवारी दुपारी लॉजखालील तीनही दुकानांवर जेसीबी चढविण्यात आला.
राजेंद्र लॉजच्या तळमजल्यावर असलेल्या राजदीप बॅग एम्पोरियममध्ये डागडुजी सुरू असताना अचानक छत कोसळल्याने मलम्याखाली सहा जण दबले गेले. पैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. लॉजचा पहिला व दुसरा माळा पाडण्यात आल्यानंतरही खालच्या राजदीप, शाहीन व आसाम टी कंपनी या पाच दुकानांवर त्याचा तसुभरही फरक पडला नव्हता. ती पाचही दुकाने अविरत सुरूच होती. मात्र, रविवारी दुपारी घात झाला.
राजदीप बॅग एम्पोरियममध्ये काम करणारे चार मजूर व व्यवस्थापक काय होते पाहून घेऊ, या प्रवृत्तीचे बळी ठरले. त्यानंतरही खालची तीन दुकाने खाली करून पाडण्यास संबंधितांनी सहजासहजी होकार दिला नाही. शाहीन पेन हाऊसच्या संचालकांनी सोमवारी होकार भरला होता. तर आसाम टी कंपनीच्या दोन्ही दुकानदारांनी केवळ दुकान बंद ठेवण्यास होकार भरला. मात्र, गुरूवारी अखेर महापालिकेने त्या तीनही दुकानांवर जेसीबी फिरवून संपूर्ण जागा मोकळी केली.
यांनी केली कार्यवाही
प्रभातचौकस्थित राजेंद्र लॉज खालील आसाम टी कंपनी, सोसायटी टी, शाहीन स्टेशनर्स ही तीनही दुकाने झोन क्र.२ व अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाडण्यात आली. महापालिका आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्या आदेशाने अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, उपअभियंता सुहास चव्हाण, अभियंता अजय विंचूरकर, अतिक्रमण निरीक्षक शाम चावरे, योगेश कोल्हे, प्रसन्नजीत चव्हान, निरज तिवारी, शुभम पांडे, समीर शाह, सुनील यादव, गजानन संगोले, सागर काळे, शेख सलीम, अब्दुल रहीम, शहबाज खान, यश सांगोले यांनी ही कारवाई केली.