अमरावतीतील ‘त्या’ अतिशिकस्त इमारतीतील तीन दुकाने सील; पाचव्या मृताची ओळख पटली
By प्रदीप भाकरे | Published: October 31, 2022 06:13 PM2022-10-31T18:13:03+5:302022-10-31T18:13:51+5:30
Amravati Building Collapse : महापालिकेकडून स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक; गुन्हा दाखल
अमरावती : स्थानिक प्रभात चौकस्थित अतिशिकस्त राजेंद्र लॉजच्या दुमजली इमारतीचे छत कोसळून तळमजल्यावरील दुकानाचा व्यवस्थापक व चार मजुरांचा दबून मृत्यू झाला होता. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. महापालिकेने सोमवारी तेथील तीनही दुकाने सील केली. तथा एका दुकानदाराने आपण आपले दुकान स्वत:हून पाडण्यास होकार दर्शविला. उर्वरित दोन भोगवटदारांच्या होकाराची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. सोमवारी ती तीनही दुकाने बंद होती.
राजेंद्र लॉजचे छत कोसळून तळमजल्यावर राजदीप बॅग हाऊस या दुकानात काम करणारे चार मजूर व व्यवस्थापकाचा मृतदेह चार तासांच्या मदतकार्यानंतर दुपारी ४.३० पर्यंत मलम्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेत मृत पावलेल्या चार जणांची ओळख रविवारीच पटली होती. तर उर्वरित एका मजुराची ओळख सोमवारी पटविण्यात आली. देवानंद हरिश्चंद्र वाटकर (३५, महाजनपुरा) असे त्या मृत मजुराचे नाव आहे.
पाचही जणांवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, महापालिकेचे उपअभियंता सुहास चव्हान यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री राजदीप बॅग हाऊसचे हर्षल शहा व एका महिलेविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. दोघांनाही मुंबईहून अमरावतीत बोलावले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, सोमवारी शहर कोतवाली पोलिसांनी मृताच्या काही कुटुंबियांचे बयान नोंदविले गेले. आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सोमवारी सकाळीच घटनास्थळी पाहणी केली. तर आढावा बैठक घेऊन अतिशिकस्त इमारतींचे दोन दिवसांत स्पॉट व्हेरिफिकेशन करण्याचे निर्देश अधिकारी व सहायक आयुक्तांना दिले. ज्या इमारतींना ३० वर्षे वा त्याहून अधिक काळ झाला असेल, अशांना स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक करण्यात आले असून, त्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात देखील गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निवेदन शहर कॉंग्रेस व मनसेने विभागीय आयुक्त तथा महापालिका आयुक्तांना दिले.
वर्षभरापुर्वी दिले होते स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट
राजेंद्र लॉजच्या तळमजल्यावरील पाचही दुकानदारांनी स्ट्रक्चरल इंजिनिअर चेतन प्रजापती यांच्या स्वाक्षरीचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट ७ सप्टेंबर २०२१ रोजी महापालिकेला दिले होते. मात्र त्यांनी गतवर्षी कुठलिही डागडुजी केली नाही. त्यामुळे महापालिकेने त्या पाचही दुकानदारांना २० ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा दुकान खाली करून डागडुजीची सुचना केली होती.
निष्काळजीपणा भोवला
२३ जुलै रोजी राजेंद्र लॉजचे पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील बांधकाम पाडल्यानंतरही खालची पाचही दुकाने नियमितपणे सुरू ठेवण्यात आली होती. यंदा प्रचंड पावसाळा झाल्याने ती इमारत अधिकच शिकस्त झाली. दरम्यान, राजदीप बॅग हाऊसचे हर्षल शहा व महिलेने तज्ञ अभियंत्याचे मार्गदर्शन न घेता, दुरूस्तीचे काम रविवारी सुरू केले. परिणामी लोखंडी गर्डर उभे केले जात असताना राजदिप बॅग हाऊसच्या दोन्ही दुकानावरील छत कोसळले. त्यामुळे पाच जणांचा मृत्यू व दोघांच्या जखमीवस्थेस हर्षल शहा व एक महिला कारणीभूत ठरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.