Amravati | नदीच्या प्रवाहात तिघे वाहून गेले, दोघांचे मृतदेह 'रेस्क्यू'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 01:49 PM2022-08-04T13:49:17+5:302022-08-04T13:58:03+5:30
माडू नदीत मध्य प्रदेशातील दोन युवक बुडाले, पूर्ण नदीमध्ये आष्टीचा तरुण गेला वाहून
अमरावती : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथील माडू नदीत बुडून दोन तरुण युवकांचा मृत्यू झाला. २ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता ते बुडाले, तर ३ ऑगस्टला त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. एक युवक पूर्णा नदीपात्रात वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या व्यक्तीचा जिल्ह्याचे शोध व बचाव पथक शोध घेत आहे.
मोर्शीपासून अवघ्या आठ किमी अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथे मध्य प्रदेशातील शिवणी येथील आठ ते दहा युवक चारचाकीने प्राचीन शिवगुंफा असलेल्या भुयारात दर्शनासाठी आले होते. महाराष्ट्र सीमेत असलेल्या मारुती महाराज देवस्थानात दर्शन घेतल्यानंतर यापैकी दुर्योधन लक्ष्मण राऊत (२७) व गणेश धोंड्याजी चवारे (२६) हे पोहण्यासाठी गंगा नदी व माडू नदीच्या संगमाजवळ पाण्यात उतरले. प्रवाहात हे दोन्ही तरुण वाहून गेल्याने त्यांच्या साथीदारांनी धावपळ करून गावकऱ्यांना बोलावले.
याबाबतची माहिती मध्य प्रदेशातील आठनेर व मोर्शी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळ मध्य प्रदेश हद्दीत येत असल्याने आठनेरचे ठाणेदार अजय सोनी, प्रभातपट्टणचे तहसीलदार वीरेंद्र उईके तसेच पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन बैतुल येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले. मात्र, नदीकाठी अंधार झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. ३ ऑगस्टला सकाळी घटनास्थळापासून पाचशे मीटर अंतरावर या दोन्ही तरुणांचे मृतदेह आढळून आले. आठनेर पोलीस व सालबर्डी येथील लोकांच्या मदतीने मृतदेह नदीबाहेर काढण्यात येऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास आठनेरचे ठाणेदार अजय सोनी करीत आहेत.
माडू नदीत माणसे बुडण्याच्या घटना वारंवार घडत असतात. आता श्रावणातील सणावारानिमित्त भाविक मोठ्या संख्येने येथे येणार आहेत. खळाळत्या नदीत पोहण्याच्या मोहामुळे आणखी जीव जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, भातकुली तालुक्यातील आष्टी येथील राजू झिंगळे (४२) हे पूर्णा नदीत वाहून गेले. ही माहिती जिल्हा कक्षाला प्राप्त होताच शोध व बचाव पथक लगेच घटनास्थळी रवाना झाले. याशिवाय बचाव पथकाने मानवी साखळी व बोटीच्या माध्यमातून शोधकार्य सुरू केले आहे. पोलीस अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी व गावकरी घटनास्थळी उपस्थित आहेत. शोध व बचाव पथकामध्ये सचिन धरमकर, दीपक पाल, विशाल निमकर, देवानंद भुजाडे, भूषण वैद्य, गणेश जाधव, योगेश ठाकरे, राजेंद्र शाहाकार, दीपक चिल्लोरकर आदी सहभागी आहेत.
धार्मिक विधी बेतला जीवावर
राजू झिंगळे हे खोलापूर येथील कोटेश्वर मंदिरात धार्मिक विधीकरिता आले होते. नदीत उतरताच ते प्रवाहासोबत वाहत गेले. रेस्क्यू टीमद्वारा पूर्णा नदीवरील पुलापासून शोध सुरू केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पथकाला अडचणी येत होत्या. त्यामुळे गळ, हूक व बोटीच्या साह्याने शोध घेण्यात आला. रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली.