तीन तालुक्यांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:05 AM2017-07-20T00:05:52+5:302017-07-20T00:05:52+5:30
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर अतितीव्र स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्टयात झाल्यामुळे ....
पावसाचे ‘कमबॅक’ : गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही २७४ मिमी कमी पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर अतितीव्र स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्टयात झाल्यामुळे राज्यात आणखी तीन दिवस पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यापार्श्वभूमिवर जिल्ह्यात मागील २४ तासांत पावसाने सार्वत्रिक हजेरी लावली. यामध्ये यंदाच्या मोसमात प्रथमच तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली व उर्वरित तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावल्याने तुर्तास शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. सरासरी ३८.२ मिमी पाऊस पडला आहे. यामध्ये चांदूररेल्वे ८२.६ मिमी, वरूड ७३.३ व धामणगाव तालुक्यांत ६४.४ मिमी पाऊस पडला आहे. ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडल्यास अतिवृष्टी समजण्यात येते. दीड महिन्यांपासून पावसाची ओढ असल्यामुळे अतिवृष्टी झाली असली तरी सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान न होता उलट फायदाच झाला आहे. यापावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. २४ तासांत अमरावती तालुक्यात १३.७ मिमी, भातकुली १६.५, नांदगाव खंडेश्वर ५३, धामणगाव रेल्वे ६४.४ मिमी पाऊस पडला.
विदर्भाच्या नंदनवनाला पावसाची प्रतीक्षा
तिवसा २३, मोर्शी ३८.६, अचलपूर २६.१, चांदूरबाजार ३५.७, दर्यापूर १४.२, अंजनगाव सुर्जी १७.३, धारणी ४१, व चिखलदरा तालुक्यात ३५.७ मिमी पाऊस पडला आहे.जिल्ह्यात एक जून ते १९ जुलै या कालावधीत ३१५ मिमी पावसाच्या सरासरीची आवश्यकता असताना आतापर्यंत २०४.९ मिमी पाऊस पडला. मागील वर्षी याच तारखेला ४७८.३ मिमी पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्यापही २७४ मिमी पाऊस कमी आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर मोड आलेल्या क्षेत्रात दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्याला मात्र पावसाची प्रतीक्षा आह्. एक जून ते १९ जुलै या कालावधीत ५२७.९ मिमी सरासरी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ३४१.८ मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस १८१.१ मिमीने कमी आहे.मागील वर्षी याच तारखेला ६७५ मिमी पाऊस पडला होता. त्या तुलनेत ३३२.२ मिमी पाऊस कमी आहे.
अशी राहणार २५ जुलैपर्यंत हवामान स्थिती
वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या ओरिसा व आंध्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र होते. याच्याशी संबंधित चक्राकार वारे ७.५ किमी अंतरावरून वाहत होते. या कमी दाबाच्या क्षेत्राचे तीव्र दाबाच्या क्षेत्रात रूपांतरण झाले असून हे क्षेत्र विदर्भाकडे सरकत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानपासून कमी दाबाचा मान्सून ट्रॅफ सक्रिय आहे. गुजरात किनारपट्टीपासून केरळपर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे.
२० ते २१ जुलैदरम्यान विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. अप्पर वर्धासह पूर्णा, चारघड व सपन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात भरपूस पाऊस,२२ ते २५ जुलैदरम्यान बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याच काळात रखडलेल्या पेरण्या आटोपण्याचे आवाहन हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.