जिल्ह्यातील तीन हजार पेट्रोलपंप कर्मचारी लसीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:13 AM2021-05-20T04:13:05+5:302021-05-20T04:13:05+5:30
भीती कायम, दररोज इतर जिल्ह्यातील वाहनधारकांना देतात पेट्रोल, डिझेल मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : चोवीस तास पेट्रोल पंपावर वाहनधारकांना ...
भीती कायम, दररोज इतर जिल्ह्यातील वाहनधारकांना देतात पेट्रोल, डिझेल
मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : चोवीस तास पेट्रोल पंपावर वाहनधारकांना पेट्रोल-डिझेलची सेवा देणारे तीन हजार खासगी कर्मचारी आजही कोरोना लसीपासून वंचित आहेत. आतापर्यंत शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना जीवघेण्या कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख आजही कायम आहे. कोरोना लढ्याशी सामना करणाऱ्या पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेविका यांच्यासह अंगणवाडी सेविका अशा १२ विभागांतील कर्मचाऱ्यांना कोरोनायोद्धा म्हणून लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे, बँक कर्मचारी, विद्युत कर्मचाऱ्यांसोबतच सर्वांच्या संपर्कात येणारी खाजगी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. मात्र, दररोज शेकडो लोकांच्या संपर्कात येणाऱ्या पेट्रोल-डिझेल पंप संचालक व नोकरदारांना लस देण्यात आली नाही.
--------------------
पंपमालक, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
जीवनाश्यक वस्तूंप्रमाणे पेट्रोल व डिझेलची सर्वांना आवश्यकता असते. पंपावरील कर्मचारी आपली सेवा देतात. एखाद्या गाडीत कोरोना रुग्ण असतानाही हे कर्मचारी इमाने-इतबारे त्या वाहनधारकांना डिझेल -पेट्रोलची सेवा देतात. अशातच त्यांना कोरोनाची लागण होते. आजपर्यंत शंभरहून अधिक डिझेल-पेट्रोल पंपधारक व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
----------------------
तीन जिल्ह्यांचे केंद्रबिंदू असलेल्या धामणगाव तालुक्यातील पेट्रोल-डिझेल पंपधारकांना व कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली नाही. आम्ही दररोज शेकडो वाहनधारकांना सेवा पुरवितो. आम्ही कोरोनायोद्ध्यांसारखे काम करीत आहोत. आम्हाला आता तरी पहिली लस द्यावी.
- अमित जयस्वाल, संचालक, पेट्रोल-डिझेल पंपधारक, धामणगाव रेल्वे