अमरावती जिल्ह्यात एसीबीचे एकाच दिवशी तीन ट्रॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 09:20 PM2020-09-08T21:20:04+5:302020-09-08T21:20:26+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती घटकाने मंगळवारी तब्बल तीन सापळे यशस्वी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती घटकाने मंगळवारी तब्बल तीन सापळे यशस्वी केले. वरूड, धामणगाव रेल्वे व धारणी येथे सापळे रचून सरपंच, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी, प्रभारी दुय्यम निबंधक व एका खासगी दस्तलेखकाला लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली.
सरपंच, ग्रामसेवकास लाच घेताना अटक
वरूड तालुक्यातील बेसखेडा येथील सरपंच विष्णु सदाशिवराव यावले (४७) व तेथे कार्यरत ग्रामसेवक पवन ओंकार सोमवंशी (३५) यांना १४ हजार रुपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
वरूड पंचायत समितीलगत असलेल्या एका चहा टपरीस्थळी मंगळवारी ही एसीबीने ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे ग्रामरोजगार सेवक आहेत. ग्रामपंचायत बेसखेडा येथे सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेमध्ये बोगस रोजगार दाखवा, त्याचे बिल काढा आणि त्यापोटी प्रत्येकी १० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी ग्रामसेवक व सरपंचांनी केली. तडजोडीअंती दोन्ही आरोपींनी एकूण १४ हजार रुपये लाच स्विकारली. दोन्ही आरोपींना वरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
धारणी पोलीस ठाण्याचा कर्मचारी जाळ्यात
धारणी पोलीस ठाण्याचा कर्मचारी सुशील गुल्हाने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली.
जांबू गावातील तक्रारदार ४५ वर्षीय महिलेच्या विरोधात पोलिसांत काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल झाली होती. दरम्यान, महिलेचे जावई व त्यांचे मोठे भाऊ यांचे गुन्ह्यात नाव न गोवण्यासाठी नायक पोलीस शिपाई सुशील गुल्हाने याने चार हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत सदर महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सुशील गुल्हानेने त्या महिलेला जयस्तंभ चौकातील एका प्रेस दुकानामध्ये पैसे घेऊन बोलावले होते. ती तेथे पैसे घेऊन पोहोचल्यावर तिच्याकडील पैसे स्वीकारताना सुशील गुल्हाने याला लाचलुचपत विभागाने धाड टाकून रंगेहाथ पकडले.
दुय्यम निबंधक ट्रॅप
धामणगाव रेल्वे येथे मोठ्या वडिलांच्या नावे असलेल्या जागेपैकी तिसरा हिस्सा जागा नावाने करून देण्याच्या मोबदला म्हणून ५ हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या प्रभारी दुय्यम निबंधकासह एका खाजगी इसमास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ही कारवाई केली. कुंडलिक कोमल राठोड (३०) असे प्रभारी दुय्यम निबंधकाचे, तर एजाज खान बिस्मिल्ला खान (३४) असे खासगी दस्तलेखकाचे नाव आहे. मंगळवारी कार्यालयातच दोघांनी लाच स्विकारली. तक्रारकर्ता तळेगाव दशासर येथील रहिवासी आहे. दत्तापूर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.