मेळघाटाने अनुभवले तीन आठवड्यांनंतर सूर्यदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:29 AM2019-08-12T01:29:11+5:302019-08-12T01:29:28+5:30
मेळघाटात तब्बल तीन आठवड्यांनंतर शनिवारी सूर्यदर्शन झाले. सलग दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जीवनमान विस्कळीत झाले होते. सततची झड राहिल्याने कपडे धुण्याचा व वाळविण्याची अडचण निर्माण झाली होती. ती शनिवारी-रविवारी दूर झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी/चिखलदरा: मेळघाटात तब्बल तीन आठवड्यांनंतर शनिवारी सूर्यदर्शन झाले. सलग दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जीवनमान विस्कळीत झाले होते. सततची झड राहिल्याने कपडे धुण्याचा व वाळविण्याची अडचण निर्माण झाली होती. ती शनिवारी-रविवारी दूर झाली. दरम्यान दुपारपासून शेतातील डवरणी व अन्य कामांना नव्याने सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.
शनिवारच्या सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. धारणीत १ जून ते १० आॅगस्ट या कालावधीत अपेक्षित असलेल्या ६७६ मिमी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात ९०९.५ मिमी अर्थात १३४.६ टक्के पाऊस पडला. या विक्रमी पावसामुळे २०२० च्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भसणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलग दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सिपना, गडगा, तापी, खंडू या मोठ्या नद्यांसह लहान नद्या व नाले दुथडी भरून वाहत होते. सिपना व गडगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. शनिवारी पूर ओसरल्यानंतर दळणवळण सुरळीत झाले. मात्र, सलग दुसºया दिवशी अनेक गावांचा वीजपुरवठा पूर्ववत झालेला नव्हता. शनिवारी सूर्यदर्शनामुळे नागरिकांना मुक्त संचार करण्यास वाव मिळाला. चिखलदरा तालुक्यात मान्सूनच्या ७१ दिवसात ८९९.३ मिमीच्या तुलनेत प्रत्यक्षात १०७३ मिमी ( ११९.४ टक्के) पावसाची नोंद झाली.