सुरक्षेअभावी ‘ते’ तीन कामगार पडले मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 10:41 PM2018-03-04T22:41:10+5:302018-03-04T22:41:10+5:30
भुवनेश्वरी रिफायनिंग प्रा. ली. मध्ये वेस्टेज पाण्याच्या टाकीलगत सुरक्षेचा अभाव असल्यामुळे तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहेत.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : भुवनेश्वरी रिफायनिंग प्रा. ली. मध्ये वेस्टेज पाण्याच्या टाकीलगत सुरक्षेचा अभाव असल्यामुळे तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहेत. तेथे काम करताना कंपनी मालकाने सुरक्षेसंबंधी उपाय करणे आवश्यक होते. मात्र, सुरक्षेचा अभाव असल्यामुळेच ही घटना घडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने कंपनी मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
स्थानिक बडनेरा बायपास मार्गावरील एमआयडीसीमधील भुवनेश्वर रिफाइनिंग या कंपनीतील पाण्याच्या टाकीत तीन मृतदेह आढळल्याने शनिवारी रात्री खळबळ उडाली. रिफायनरीच्या शेवटच्या भागात असलेल्या वेस्टेज पाण्याच्या एका टाकीत प्रवीण गुलाब चौधरी (३४, रा. दाभा), दिलीप मनोहरपंत देवरणकर (५८, रा. उषा कॉलनी, साईनगर), वैभव देविदास नेवारे (२७, रा. जुनी वस्ती, बडनेरा) यांचा मृतदेह आढळून आला.
रविवारी ३ मार्च रोजी आॅपरेटर प्रवीण, इलेक्ट्रिशियन दिलीप व मदतनिस वैभव हे तिघे टाकीतील मशीन दुरुस्तीसाठी गेले होते. मात्र, त्यांना तेथे पाठविण्यापूर्वी कंपनी मालकाने त्यांच्या सुरक्षेविषयी कोणतीही काळजी घेतली नाही. तसेच कामगार काम करीत असताना त्यांच्यावर सुपरवायझिंग करणारेही उपलब्ध नव्हते. तिन्ही कामगार टाकीत पडले कसे व त्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण काय, हे संभ्रमात टाकणारे आहे. विद्युत शॉक लागून ते पाण्याच्या टाकीत पडले असावेत किंवा टाकीतील घाणपाण्याच्या दुर्गंधीतून निघणाºया गॅसमुळे जीव गुदमरून त्या तीनही कामगारांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे.
रवी राणांच्या प्रयत्नाने नातेवाईकांना आर्थिक मदत
मृत कामगारांच्या नातेवाईकांनी रविवारी सकाळी राजापेठ पोलीस ठाणे गाठून भुवनेश्वर रिफाइनिंगच्या मालकावर कारवाईची मागणी रेटून धरली. यावेळी आ. रवी राणा यांनी नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर आ. राणांसह सर्व नातेवाईक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कक्षात बसून चर्चा केली. कंपनी मालकाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा नातेवाईकांनी राणांसमोर मांडली. दरम्यान भाजपाचे राज्यप्रवक्ता शिवराय कुळकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, प्रवीण हरमकर, रामा सोळंके, विधी सभापती सुमती ढोके, योगेश कावर यांनी नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे प्रयत्न केले. चर्चेनंतर कंपनी मालकासोबत बोलणी करून पाच लाखांची मदत देण्याचे ठरले. त्यापैकी ५० हजार रुपये नातेवाईकांनी रविवारी देण्यात आले असून, उर्वरित रक्कमेचे धनादेश देण्यात आले आहे. आ. राणांच्या अधिकअधिक मदत मिळून देण्यासाठी पुढाकार घेतला.
नातेवाईक संतप्त, मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिकेला अडविले
एमआयडीसीस्थित भुवनेश्वर रिफाइनिंग प्रा. ली.च्या मालकावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करीत संतप्त नातेवाईकांनी मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिकेला अडविले. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत फॅक्टरीत गोंधळ सुरु होता. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी मध्यस्ती करून प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांचा रोष शांत झाला. नंतर मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठविले.
भुवनेश्वरी रिफायनरी कंपनीतील पाण्याच्या टाकीवर सुरक्षा उपाययोजना नव्हत्या. सुरक्षेविषयी निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले असून सबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल.
- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक