अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By प्रदीप भाकरे | Published: February 14, 2023 05:52 PM2023-02-14T17:52:44+5:302023-02-14T17:54:26+5:30
मुलगी तिच्या घरात एकटी असताना आरोपीने तिचा विनयभंग केला
अमरावती : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व १५०० रुपये दंड, न भरल्यास अतिरिक्त एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधिश क्रमांक ५ पी. एन. राव यांनी १४ फेब्रुवारी रोजी हा निर्णय दिला.
विधीसुत्रानुसार, सुनील पंढरीनाथ शेट्टे (वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष, रा. राजुराबाजार, ता. वरूड) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. १४ ऑगस्ट २०१६ रोजी एक अल्पवयीन मुलगी तिच्या घरात एकटी असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. याबाबत तिने वरूड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील मंगेश भागवत यांनी पाच साक्षीदार तपासले. ती साक्ष ग्राहय धरून आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक संगिता गावंडे यांनी केला होता. तर वरूड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र बायस्कर व पोलीस शिपाई अरूण हटवार यांनी पैरवी केली.