अंघोळीसाठी धबधब्यात उतरणे बेतले 'त्या' तीन युवकांच्या जीवावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:45 PM2020-07-23T21:45:11+5:302020-07-23T21:45:59+5:30
मध्य प्रदेश हद्दीतील आणि परतवाड्याहून १५ किमी अंतरावरील धारखोरा धबधब्यातील डोहात बुडून अमरावती येथील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मध्य प्रदेश हद्दीतील आणि परतवाड्याहून १५ किमी अंतरावरील धारखोरा धबधब्यातील डोहात बुडून अमरावती येथील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. एकमेकांच्या वाचविण्याच्या प्रयत्नात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
दीपक विनोद मिश्रा (१८, रा. गोपालनगर, अमरावती), आशिष कोटेचा (१९, रा. नवी वस्ती, बडनेरा) व विनय कुशवाह (रा. मसानगंज, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी या तिघांसह ऋषी मिश्रा, तुषार चौहान, कृष्णा उमरटे हे सहा जण दुचाकीने अमरावती येथून धारखोऱ्याकडे गेले होते. त्यातील एकाचा पाय चिखलात शिरल्याने तो डोहात बुडाला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अन्य दोघेसुद्धा बुडाले. ते बुडाल्याची माहिती ऋषी मिश्रा, तुषार चौहान, कृष्णा उमरटे यांनी परतवाडा पोलिसांना गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास दिली. यातील दोघांनी थेट दुचाकीने परतवाडा पोलीस ठाणे गाठल्याची माहिती आहे. धारखोरा परिसरात मोबाईल रेंज नसल्याने हा परिसर संपर्कविहीन आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळा आला.
दरम्यान, सायंकाळच्या सुमारास तिघांचेही मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तर मृतांच्या नातेवाइकांनी परतवाडा पोलीस ठाणे गाठले. सर्व सहाजण एकमेकांचे हात धरून आंघोळीसाठी डोहात उतरले असल्याचा एक घटनाक्रम समोर आला आहे.
मध्य प्रदेशातील बानूर ग्रामपंचायत अंतर्गत हा परिसर येत असून, घटनेची माहिती मिळताच परतवाडाचे ठाणेदार सदानंद मानकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. परतवाडा ते धारणी मार्गावरून बुरडघाटहून जवळपास सात किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेशच्या भैसदेही तालुक्यात हा प्रसिद्ध धबधबा आहे.