Amravati: अमरावतीच्या ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये बिबट्याचा थरार, रेस्क्यू पथकाच्या वाहनावर झडप
By गणेश वासनिक | Published: October 25, 2023 10:07 PM2023-10-25T22:07:25+5:302023-10-25T22:07:58+5:30
Amravati: गत महिनाभरापासून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, शासकीय पाठ्यपुस्तक परिसरात तळ ठोकून असलेला बिबट्या बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काही अंतरावरील ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये शिरल्याने या भागातील नागरिकांनी प्रचंड थरार अनुभवला.
- गणेश वासनिक
अमरावती - गत महिनाभरापासून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, शासकीय पाठ्यपुस्तक परिसरात तळ ठोकून असलेला
बिबट्या बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काही अंतरावरील ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये शिरल्याने या भागातील नागरिकांनी प्रचंड थरार अनुभवला. अतिशय दाट झाडी-झुडपे असलेल्या मणिपूर ले-आऊटमध्ये बिबट्याचा शोध घेण्यासाठी निघालेल्या रेस्क्यू पथकाच्या वाहनावरही त्याने झडप मारली. सुदैवाने वन कर्मचारी बचावले. यादरम्यान झालेल्या धावपळीत बिबट्याने दोघांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेतापर्यंत बिबट्या ऑपरेशन सुरूच होते.
‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये बिबट्या असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच लगतच्या लक्ष्मीनगर, शोभानगर, महेंद्र कॉलनी, प्रवीणनगर, बजरंग टेकडी आदी भागातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. एकीकडे वन विभागाचा चमू बिबट्याचा शाेध घेत असताना दुसरीकडे नागरिकांची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली, हे विशेष. दरम्यान दाट झाडाझुडपात बिबट्या दडून बसल्याने वन कर्मचारी, वन्यजीवप्रेमींनी परिसर पिंजून काढला. बिबट्याला सुरक्षित जेरबंद करण्यासाठी परिसराला जाळीचे संरक्षण लावण्यात आले. बिबट्या नेमका कोठे दडून बसला याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेरा, बुलडोजरची मदत घेण्यात आली. मात्र, सायंकाळी ६ वाजल्यानंतरही नागरिकांची मोठी गर्दी असल्याने बिबट्याला बंदुकीद्वारे बेशु्द्ध (ट्रँक्विलाइज) करता आले नाही. घटनास्थळी सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, आरएफओ वर्षा हरणे, रेस्क्यू पथकाचे आरएफओ प्रभाकर वानखडे, पशु वैद्यकीय अधिकारी सागर ठोसर आदी उपस्थित होते.
वन विभागासह रेस्क्यू पथकाची चमू घटनास्थळी तळ ठोकून आहे. मणिपूर ले-आऊट परिसरात बुधवारी सकाळी बिबट्या लोकांना आढळून आला. त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- अमितकुमार मिश्रा, उपवनसंरक्षक, अमरावती.