अमरावती जिल्ह्यातले वाघोबा मध्यप्रदेशच्या जंगलात शिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 06:27 PM2018-10-30T18:27:44+5:302018-10-30T18:28:38+5:30
दहा दिवसांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक वाघ मध्य प्रदेशच्या जंगलात शिरल्याची माहिती आहे.
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दहा दिवसांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक वाघ मध्य प्रदेशच्या जंगलात शिरल्याची माहिती आहे. वनविभागाने महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवरील सर्व गावांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
वरोरा जंगलातील वाघाने अमरावती जिल्ह्यात दोन माणसे व पाळीव पशूंची शिकार केली. वनविभागाचा ताफा हातात काठ्या आणि बेशुद्ध करण्याच्या बंदुका, शिकार अडकविण्यासाठी मांस ठेवलेले पिंजरे घेऊन त्याच्या मागावर आहेत. वाघ पुढे-पुढे आणि कर्मचारी त्यांच्या मागे असा हा शिवाशिवीचा खेळ दहा दिवसांपासून सुरू आहे. वनाधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा रात्रंदिवस त्या नरभक्षक वाघाच्या पाऊलखुणांवर चालत असताना, सोमवारी सायंकाळी ४ वाजता धारूड गावानंतरचे लोकेशन मंगळवार सायंकाळपर्यंत वनविभागाला सापडले नव्हते.
गावागावांत दवंडी
गावागावांत दवंडी पिटण्यात आली असून, सोमवारी सायंकाळी ४ नंतर वाघाचे लोकेशन वनविभागाजवळसुद्धा नसल्याने शोधमोहीम सुरू झाली. वाघाची माहिती मध्य प्रदेश सीमेवरील गावांमध्ये पसरताच सर्वत्र दहशत पसरली आहे. 'भागो रे भागो शेर आया' म्हणत काहींनी दिवसाच घराचे दार बंद करून आश्रय घेतला आहे.
दररोज २० किमीचा टप्पा
वरोरा जंगलातील या युवा वाघाने दररोज २० किलोमीटरचा टप्पा पार केल्याचे आतापर्यंतच्या वाटचालीवरून स्पष्ट होत आहे. अमरावतीचे सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, परतवाडा वनपरिक्षेत्राधिकारी शंकर बारखडे, वडाळीचे कैलास भुंबर, वरूडचे प्रशांत लांबाडे, वनपाल संतोष धापड, मकसूद खान, वनरक्षक मिलिंद गायधने, राजेश खडसे, नावेद काझी, देवानंद वानखडे, विजय तायडे, किशोर धोत्रे आदींनी मध्यप्रदेश सीमेवरील गावांना मंगळवारी भेटी देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
या गावातील नागरिकांना अलर्ट
मध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील आठवणीत रेंजमध्ये तेथील वनअधिकाºयांनीसुद्धा वाघावर लक्ष केंद्रित करीत नागरिकांना सूचना दिल्या. परतवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत घाटलाडकी, रेडवा चिचकुंभ मध्यप्रदेशच्या अर्धमानी, हिरादेही, नळामानी, धारुड आदी गावांचा समावेश असून, हिरादेहीच्या घनदाट जंगलात वाघाने आश्रय घेतल्याची माहिती वनाधिकाºयांनी दिली. वृत्त लिहिस्तोवर त्याने कुठलीच शिकार मंगळवारी केली नसल्याचे सांगण्यात आले.
मध्य प्रदेशच्या पलासपानीत दोन गार्इंवर हल्ला
नरभक्षी वाघाने मंगळवारी सकाळी मध्यप्रदेशच्या आठनेर तालुक्यातील पलासपाानी गावाच्या जंगलात धुमाकूळ घातला. सकाळी ९ वाजता एकापाठोपाठ दोन गाईंवर त्याने हल्ला चढविला. मात्र, गुराख्याने आरडाओरड केल्याने वाघ तेथून पळाला. परतवाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडेसोबत वनविभागाच्या पथकाने तेथील पाहणी केली असता, पगमार्क व हमला करण्याची पद्धत पाहता तोच वाघ असल्याचे स्पष्ट झाले. धारुड येथून २० किलोमीटर अंतरावर पलासपाणी आहे. मध्यप्रदेश वनविभागाच्या पथकानेसुद्धा आता त्या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. मंगळवारी सायंकाळी ४ वाजतानंतर वाघाचे लोकेशन वनविभागाला मिळाले.