अमरावती जिल्ह्यातील मेळघाट जंगलातून वाघ, बिबटाचे कातडे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 08:06 PM2018-02-05T20:06:47+5:302018-02-05T20:09:34+5:30
वाघाची शिकार व त्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच मेळघाट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून एकास अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी पसार झाला. ही कारवाई मेळघाट वनविभाग व वाईल्ड लाईफ क्राईम सेल यांच्या संयुक्त पथकाने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाघाची शिकार व त्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच मेळघाट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून एकास अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी पसार झाला. ही कारवाई मेळघाट वनविभाग व वाईल्ड लाईफ क्राईम सेल यांच्या संयुक्त पथकाने केली. सुखदेव धोटे (५३, रा. गेईबारसा मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.
त्याने वाघ आणि बिबटचे कातडे मोटरसायकलने पोत्यात भरून आणले होते. सोबत त्याचा साथीदारही होता. वनकर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून त्याच्याशी सौदा करीत वरुड-प्रभातपट्टण मार्गावर त्याला अटक केली. दरम्यान त्याचा सहकारी पळून गेला. त्याची मोटरसायकल जप्त करण्यात आली.
ही कारवाई मेळघाट व्याघ्र्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपवनसंरक्षक विशाल माळी, आकाश सारडा, जीवन दहिकार, अनिल चिमोटे, संदीप खंडारे, हरीश दामोदरे, प्रभाकर कोकाटे, सिपना वन्यजीव विभागाचे आशिष चक्रवर्ती, उल्हास भोंडे व राजेश धुमाळे यांनी केली. पुढील तपास अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मीना यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक भोंडे, वरूडचे वनपरिक्षेत्र अधिकारी काळे, गायधने करीत आहे.
मध्यप्रदेशात केली शिकार
तस्करांनी मध्यप्रदेशच्या चितलपाठा मुलताई जंगल परिसरात या दोन्ही शिकारी केल्याची माहिती त्यांनी प्राथमिक चौकशीअंती दिली. हे कातडे शावकाचे, तर पाच वर्षांच्या बिबटाचे असावे असा अंदाज लावण्यात येत आहे.
एक आरोपी पसार असून त्याचा आम्ही शोध घेत आहोत. जंगलात आणखी शिकारी सक्रिय आहेत का? याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करू.
- विशाल माळी,
उपवनसंरक्षक, अमरावती