वाघिणीचा महिलेवर हल्ला, कंजोली गावातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 08:19 PM2019-07-13T20:19:08+5:302019-07-13T20:19:23+5:30
धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणा-या कंजोली गावातील आदिवासी शेतकरी महिलेवर ई-वन वाघिणीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री उघड झाली.
अमरावती - धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया कंजोली गावातील आदिवासी शेतकरी महिलेवर ई-वन वाघिणीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री उघड झाली. मीराबाई रामेश्वर कासदेकर असे जखमी महिलेचे नाव आहे. कंजोली, राणीगाव, धूळघाट रेल्वे या परिसरातील नागरिकांमध्ये ई-वन वाघिणीच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रामेश्वर कासदेकर व त्यांची पत्नी मीराबाई कासदेकर हे आदिवासी कुटुंब गावाशेजारी असलेल्या आपल्या शेतातील नव्याने पेरणी केलेल्या मका पिकाच्या रखवालीकरिता रात्री शेतात गेले होते. मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांना पिकात रानडुक्कर शिरल्याचा संशय आल्याने ते पिकानजीक आले. मात्र, रानडुकराऐवजी त्यांचा सामना ई-वन वाघिणीशी झाला. ती वाघीण मीराबाई कासदेकर यांच्या अंगावर धावून गेली. तिचा पंजा हातावर पडल्याने ओरबडल्याचे व्रण उमटले. पती-पत्नीने आरडाओरड करून वाघिणीला पळविण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून नागरिकांनीही शेताकडे धाव घेतली. ई-वन वाघिणीने तेथून पळ काढला. कंजोली येथील नागरिकांनी धूळघाट रेल्वे परिक्षेत्रातील वनकर्मचा-यांना माहिती दिली असता, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी मीराबाईला धूळघाट रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता आणले.
ती वाघीणच
धूळघाट रेल्वे वन परिक्षेत्राच्या वनअधिकारी व कर्मचाºयांनी हल्लेखोर ही ई-वन वाघीणच असल्याचा दावा केला. तिचा राणीगाव परिसरात शोध सुरू आहे. या वाघिणीने आतापर्यत चिखलदरा तालुक्यातील अनेक बकºया, कोंबड्या व अन्य जनावरे फस्त केली. दरम्यान, या संदर्भात धारणीच्या वनाधिकाºयांसोबत संपर्क होऊ शकला नाही.
धूळघाट रेल्वे परिसरात ई-वन वाघीण फिरत असल्याची माहिती आम्हाला वनाधिकाºयांनी दिली. कंजोली शिवारात आढळलेल्या पायाच्या ठशांवरून त्यांनी पडताळणी केली आहे.
- बाला भिलावेकर, सरपंच, राणीगाव