मेळघाटात व्याघ्र गणना वांध्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 10:34 PM2018-01-31T22:34:01+5:302018-01-31T22:34:31+5:30
देशात चौथी व्याघ्र प्रगणना २० जानेवारीपासून राबविण्यात आली. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जीपीएस यंत्रणेअभावी व्याघ्र गणना वांध्यात आली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : देशात चौथी व्याघ्र प्रगणना २० जानेवारीपासून राबविण्यात आली. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जीपीएस यंत्रणेअभावी व्याघ्र गणना वांध्यात आली. त्यामुळे आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रगणना नव्याने होणार आहे. तथापि, यासंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
देहरादूनच्या राष्टÑीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशावरून देशभरातील जंगलांमध्ये ट्रान्झॅक्ट लाइन टाकून वाघ व अन्य वन्यजिवांचे अधिवास व संख्या निश्चितीसाठी प्रगणना २० ते २७ जानेवारीदरम्यान राबविण्यात आली. परंतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट, सिपना व गुगामल वन्यजीव विभागातील वनकर्मचाºयांनी वेतनवाढीचा मुद्दा आणि तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकून जीपीएस यंत्र हाताळण्यास नकार दिला. त्यानंतर १९ जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले.
यादरम्यान अकोट वन्यजीव विभागातील तीन वनकर्मचाºयांचे निलंबन करण्यात आले. हे निलंबन मागे घेण्यासाठी २४ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेले बेमुदत काम बंद आंदोलन आजतागायत कायम आहे. या आंदोलनाचा परिणाम प्रगणनेवर झाला असून, मेळघाटात वाघांची नेमकी संख्या अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. ३१ जानेवारीपर्यंत सादर करावयाचा वन्यजीव प्रगणनेचा अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकाºयांकडून सादर होऊ शकला नाही. दरम्यान, राज्यात पेंच, ताडोबा-अंधारी, सह्याद्री, बोर, नवेगाव- नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांत कशीबशी आटोपली.
काय आहे जीपीएस यंत्र?
जीपीएस यंत्राद्वारे जंगलातील अचूक लोकेशन वनाधिकाºयांना बसल्या जागी मिळविता येते. वनकर्मचारी नेमके कोठे, कसे कर्तव्य बजावतात, हेसुद्धा क्षणात कळते. वन्यजिवांच्या अधिवासाची माहिती रेखांशावरून सिद्ध करता येते. सर्वेक्षण आणि कर्तव्यात चूक असू नये, यासाठी जीपीएस यंत्र महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.
वनकर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम व्याघ्रगणनेवर झाला आहे. एनटीसीएच्या निर्देशानुसार पुन्हा नव्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रगणना केली जाईल.
- विशाल माळी
उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्राइम सेल