लिंगा शिवारात वाघाने केली गाय-वासराची शिकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:14 AM2021-04-01T04:14:03+5:302021-04-01T04:14:03+5:30
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट लिंगा/वरूड : लिंगा येथील एकनाथ शेळके यांच्या एकलविहीर रस्त्यावरील हत्तीधरा प्रकल्पालगत शेतात असलेल्या गाय-वासराची वाघाने शिकार ...
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट
लिंगा/वरूड : लिंगा येथील एकनाथ शेळके यांच्या एकलविहीर रस्त्यावरील हत्तीधरा प्रकल्पालगत शेतात असलेल्या गाय-वासराची वाघाने शिकार केली. ३१ मार्चला पहाटेच्या वेळी ही घटना निदर्शनास आली. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला. वाघाने जंगलातून शिवारात ठाण मांडल्याच्या चर्चेतून भीतीचे सावट पसरले आहे.
लिंगा वन बीटमधील एकलविहीर-लिंगा मार्गावर हत्तीधरा प्रकल्पालगत गट नं . २१० मध्ये लिंगा येथील एकनाथ हरिभाऊ शेळके यांचे शेत आहे. या शेतात बांधलेली सहा वर्षे वयाची जर्सी गाय आणि दीड वर्षे वयाचे वासरू यांची ३१ मार्चला पहाटेच्या वेळी वाघाने शिकार केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती वनविभागाला देताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वनपाल भारतभूषण अळसपुरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वाघाच्या पायांचे ठसेसुद्धा मिळाले असून, वाघाने या परिसरात शिरकाव केल्याची चर्चा आहे.
-------------
लिंगा परिसरात वाघाने गायीची शिकार केली. शेतकऱ्यांनी एकटे शेतात न जाता दोन-तीन लोकांनी जावे तसेच रात्री-अपरात्री शेतावर जाणे टाळावे. सावध राहून शेतावर काम करावे. उन्हाळ्यामध्ये हिंस्त्र पशूंचा वावर वाढत असल्याने काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
- प्रशांत लांबाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी