वाघांचे विच्छेदन होणार ‘इन कॅमेरा’, गुप्तता बाळगण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 05:15 PM2018-05-28T17:15:08+5:302018-05-28T17:15:08+5:30
नैसर्गिक अथवा अनैसर्गिकरीत्या वाघाचा मृत्यू झाल्यास त्याचे विच्छेदन आता सार्वत्रिकरीत्या होेणार नाही. प्राधिकृत अधिका-यांच्या देखरेखीत आणि नियंत्रणात ‘इन कॅमेरा’ विच्छेदन करून कमालीची गुप्तता बाळगण्याचे निर्देश केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (एफबीआय) ने दिले असून, हे आदेश देशभरातील ४५ व्याघ्र प्रकल्पांत पोहोचले आहेत.
- गणेश वासनिक
अमरावती : नैसर्गिक अथवा अनैसर्गिकरीत्या वाघाचा मृत्यू झाल्यास त्याचे विच्छेदन आता सार्वत्रिकरीत्या होेणार नाही. प्राधिकृत अधिका-यांच्या देखरेखीत आणि नियंत्रणात ‘इन कॅमेरा’ विच्छेदन करून कमालीची गुप्तता बाळगण्याचे निर्देश केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (एफबीआय) ने दिले असून, हे आदेश देशभरातील ४५ व्याघ्र प्रकल्पांत पोहोचले आहेत.
वाघांच्या शिकारी रोखण्यासाठी केंद्र शासनाने उपाययोजना आखल्या असून, वन्यपशूंच्या मार्केटिंगबाबत बंधने लादली आहेत. विशेषत: वाघांचे संरक्षण व संगोपनाची जबाबदारी असलेल्या दिल्ली येथील राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण संचालकांंनी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव विभाग) यांना पत्र पाठवून वाघांचा मृत्यू झाल्याची घटना कळताच ती गोपनीय ठेवणे बंधनकारक केले आहे. वाघांचे विच्छेदन करताना प्राधिकृत अधिका-यांच्या देखरेखीत आणि नियंत्रणात करावे लागेल. वैद्यकीय अधिका-यांच्या सल्ल्यानुसार विच्छेदन हे ‘इन कॅमेरा’ करताना कोणत्याही उणिवा राहू नये, अशा सूचना आहेत.
व्हिडीओ क्लिप, छायाचित्रे, वृत्तपत्रात बातम्या, सोशल मीडियावर वाघांच्या विच्छेदनाची माहिती सार्वत्रिक झाली तर संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आहेत. राज्य व देशात वन्यपशूंचे नैसर्गिक व अनैसर्गिक मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. परिणामी भारतीय दंड संहितेच्या वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार वन्यपशूंचे विच्छेदन करणे बंधनकारक आहे. यापूर्वी वन्यपशूंचा मृत्यू झाल्यास घटनास्थळीच विच्छेदन व्हायचे. कोणतीही गोपनीयता ठेवण्यात येत नव्हती. वन्यपशूंच्या मृत्यूबाबत बातम्या प्रकाशित करून वनविभाग माहिती सार्वत्रिक करीत होते. प्रकाशित होणा-या बातम्यांमुळे तस्करांना रान मोकळे व्हायचे. त्यानंतर वन्यपशूंच्या शिकारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे वास्तव वनविभागाच्या निदर्शनास आले आहे. परंतु आता वन्यपशूंच्या मृत्यूबाबत कमालीची गोपनीयता बाळगताना विच्छेदनाची माहिती बाहेर पडणार नाही, ही दक्षता वनधिका-यांना घ्यावी लागणार आहे.
एनजीओंच्या हस्तक्षेपाला लगाम
व्याघ्र प्रकल्पात असलेल्या वाघांची जबाबदारी जणू आमच्यावरच या आविर्भावात वावरणा-या अशासकीय सदस्य (एनजीओ) यांना वाघांचे विच्छेदन करतेवेळी हजर राहता येणार नाही. यापूर्वी एनजीओ हे विच्छेदनाच्या वेळी उपस्थित राहून छायाचित्रे प्रसिद्ध करीत होते. परंतु, नवीन नियमांनी एनजीओंच्या हस्तक्षेपांना लगाम लावला आहे. त्यामुळे वाघांच्या विच्छेदनाचा होणारा प्रसार व प्रचार थांबणार आहे.
वाघांच्या छायाचित्रांची प्रसिद्धी नको
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठी आहे. विशेषत: ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची बºयापैकी गर्दी राहते. यात काही पर्यटक वाघांचा संचार असलेल्या परिसरातील मोबाईल, कॅमेºयात हालचाली टिपतात. वाघांचे छायाचित्र काढून ते सोशल मीडियावर अपलोड करून सार्वत्रिक करतात. बहुतांश हेच छायाचित्रे ईलेक्ट्रॉनिक्स मीडियावर झळकतात. पर्यटकांमध्ये मोठ्या संख्येने एनजीओंचा सहभाग राहत असल्याने आता वाघांचे छायाचित्र प्रसिद्ध करू नये, असे निर्देश केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रक ब्युरोने दिले आहेत.
वाघांच्या शिकारी रोखण्यासाठी एनटीसीएने कठोर उपाययोजना केल्या आहेत. नैसर्गिक अथवा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास आता तज्ञ्जांच्या सल्ल्यानुसार वाघांचे विच्छेदन केले जाईल. गोपनीयतेला प्राधान्य देण्याबाबत व्याघ्र प्रकल्प संचालकांना कळविले आहे.
- सुनील लिमये,
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) महाराष्ट्र