व्याघ्र प्रकल्पात मद्यपान, पर्यटकांचा धुमाकूळ : दहा जणांवर कारवाई, दीड लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 07:10 PM2017-12-02T19:10:32+5:302017-12-02T19:11:13+5:30
सेमाडोह येथील निसर्ग निर्वचन संकुलामध्ये शुक्रवारी रात्री मद्यपान करून धिंगाणा घालणा-या दहा पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
परतवाडा - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित समजल्या जाणा-या सेमाडोह येथील निसर्ग निर्वचन संकुलामध्ये शुक्रवारी रात्री मद्यपान करून धिंगाणा घालणा-या दहा पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर प्रत्येकी पंधरा हजार याप्रमाणे दीड लाखांचा दंड ठोठावला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणा-या सेमाडोह येथे मोठ्या संख्येने पर्यटक जंगल सफारीसाठी येतात. नागपूर, भुसावळ आणि अमरावती येथील पन्नासहून अधिक पर्यटक निसर्ग निर्वचन संकुलाच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये शुक्रवारी रात्री मुक्कामी होते. त्यांनी दारू पिऊन मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित परिसरात दारू पिऊन मस्ती करणे, मोठ्याने नाचगाणे करणे, वन्यप्राणी व श्वापदांना इजा पोहोचेल, असे कृत्य करण्यावर बंदी आहे.
पर्यटक धिंगाणा घालत असल्याची माहिती व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना दूरध्वनीवर मिळताच सेमाडोह येथील कर्मचा-यांना तपासणी करून कारवाईचे आदेश त्यांनी दिले. यामध्ये नागपूर, अमरावती व भुसावळ येथील दहा पर्यटकांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये प्रमाणे दीड लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
सेमाडोहचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सोनुवले, वनपाल सचिन नवले, अभिजित ठाकरे व सहकाºयांनी ही कारवाई केली. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी व्याघ्र प्रकल्पाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.