विदर्भात बहेलिया टोळी पुन्हा सक्रिय; वाघांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:40 AM2018-05-12T10:40:10+5:302018-05-12T10:40:20+5:30

व्याघ्र प्रकल्पांत वाघांची शिकार करणारी मध्यप्रदेशातील बहेलिया टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Tiger shooter gang re-active; Tiger in danger | विदर्भात बहेलिया टोळी पुन्हा सक्रिय; वाघांवर संकट

विदर्भात बहेलिया टोळी पुन्हा सक्रिय; वाघांवर संकट

Next
ठळक मुद्दे व्याघ्र प्रकल्पांना अतिदक्षतेचा इशारा पाणवठ्यांवर निगराणी

गणेश वासनिक।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : व्याघ्र प्रकल्पांत वाघांची शिकार करणारी मध्यप्रदेशातील बहेलिया टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: पाणवठ्यांवर वनकर्मचाऱ्यांना ‘जागते रहो’ची सूचना असून, व्याघ्र संरक्षण दलाची सीमेवर गस्त वाढविली आहे.
विदर्भाला लागून असलेल्या कटनी, शिवनी, छिंदवाडा व बैतुल भागात बहेलिया टोळीचे वास्तव्य आहे. या टोळीचे कनेक्शन मेळघाट, पेंच, नवेगाव, नागझिरा व्याघ्र प्रकल्पांशी असल्याने येथील वाघांच्या संरक्षणाची जबाबदारी या प्रकल्पांवर आहे. विदर्भात वाघांच्या तस्करीत सक्रिय असलेला या टोळीचा प्रमुख सूत्राधार कट्टू यास नागपूर पोलीस आणि वनविभागाने अटक केली होती. नागपूर लगतच्या व्याघ्र प्रकल्पात आठ वाघांची शिकार करून कातडी दिल्लीकडे रवाना केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली होती. शिकार केलेले वाघ हे नवेगाव बांध, नागझिरा, उमरेड कऱ्हांडला येथील असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते. दरम्यान, टोळीच्या अनेक सदस्यांना अटक करण्यात आली होती. या टोळीचा कणा मोडलेला असताना, पुन्हा तप्त उन्हाची संधी साधून टोळीचे सदस्य विदर्भात सक्रिय झाले आहेत.

मेळघाट, पेंच, नवेगाव व्याघ्र प्रकल्प लक्ष्य
बहेलिया टोळीने वाघांच्या शिकारीसाठी नव्याने उभारी घेतली आहे. भैसदेही, बैतुल, बऱ्हानपूर, खंडवा असा मार्गक्रमण करून ही टोळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला लक्ष्य करणार आहे. तर पेंच, नवेगाव बांध, उमरेड कऱ्हांडला गाठण्यासाठी कटनी, छिंदवाडा, जबलपूर असा मार्ग निवडला असल्याचे पोलिसांच्या गोपनीय अहवालातून वनविभागाला संकेत मिळाले आहेत.

सोशल मीडियावरून मिळते वाघांच्या स्थळांची माहिती
एनजीओंच्या माध्यमातून सोशल मीडियावर वाघांचे छायाचित्र व्हायरल होत असते. ही बाब बहेलिया टोळीसाठी फायद्याची ठरत आहे. सोशल मीडियावर वाघांचे छायाचित्र येताच तो कोणत्या व्याघ्र प्रकल्पातील आहे, याचा शिकाऱ्यांना अंदाज येतो. त्यानुसार ही टोळी वाघांचे स्थळ, पाणवठ्याचे लोकेशन मिळविण्यात यशस्वी होत आहे. व्याघ्र प्रकल्पातील कोअर एरियाच्या माहितीसाठी स्थानिकांना आमिष दाखविण्याचा फंडाही ते वापरत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

व्याघ्र प्रकल्पात ‘अलर्ट’बाबत वरिष्ठांच्या सूचना नाहीत. मात्र, उन्हामुळे जंगलात आग लागण्याच्या घटना घडत आहेत. पाणी प्रश्नदेखील गंभीर होत आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना वन्यजिवांच्या संरक्षणासंदर्भात दक्षतेच्या मौखिक सूचना दिल्या आहेत.
- सुनील लिमये, अपर मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर.

Web Title: Tiger shooter gang re-active; Tiger in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ