चंद्रपूर जिल्ह्यातील हल्लेखोर वाघाला केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:25 PM2018-12-11T12:25:41+5:302018-12-11T13:05:42+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षी वाघाला सारणी परिसरात फिरताना पाहून ट्रँक्युलाईज करून सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास पकडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नरेंद्र जावरे
अमरावती: जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा चंद्रपूरचा नरभक्षी वाघ मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील सारणी क्षेत्रात ट्रँक्युलाईझ करून सोमवारी दुपारी ४.३० वाजता पकडण्यात आले. मागील दहा दिवसांपासून वाघाची परिसरात पुन्हा आपली दहशत पसरली होती. दोन दिवसांपासून मेगा आॅपरेशन सुरू होते. चार हत्ती तीन जेसीबी व दीडशे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या चमूने त्याला पकडले.
मध्यप्रदेशच्या सारणी परिसरातील कॉल हेडलीन प्लांटजवळ हा वाघ नागरिकांना दिसला. तेथील एबी टाईप कॉलनीत त्याने आपली दहशत पसरली होती. तीन दिवसापासून शांतीनगर परिसरात त्याने ठाण मांडला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिक दहशतीखाली आले होते. सदर वाघ नरभक्षी असल्याने तो येथेसुद्धा धुमाकूळ घालून माणसावर हल्ला करू शकतो. त्यापूर्वीच त्याच्या हालचालीवर दहा दिवसांपासून एसटीआर आणि वनविभागाच्या चमूने लक्ष ठेवले होते. दोन दिवसांपासून त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवत सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता वाघावर बेशुद्ध करण्यासाठी ट्रँक्युलाईझ करण्यात आले.
कान्हा नॅशनल पार्कमध्ये सोडणार नरभक्षीला
नरभक्षी वाघाला कान्हा नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती बैतुल उत्तर झोनचे उपवनसंरक्षक अशोक कुमार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.