वाघाचा धुमाकूळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:12 PM2018-11-02T22:12:17+5:302018-11-02T22:14:35+5:30
जिल्हाभर वाघाने मागील १४ दिवसांपासून दहशत पसरवली असतानाच, चिखलदरा शहराच्या पांढरी भागात वाघाने गाईसह म्हशीला ठार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : जिल्हाभर वाघाने मागील १४ दिवसांपासून दहशत पसरवली असतानाच, चिखलदरा शहराच्या पांढरी भागात वाघाने गाईसह म्हशीला ठार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
पूर्व मेळघाट वनविभागाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वनखंड क्रमांक ३९ मध्ये ३० आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वाघाने गाईवर हल्ला केला, तर दुपारी २ वाजताच्या दरम्यान म्हशीला ठार केले. हल्ला करणारी वाघिण असून, तिच्यासह दोन बछडे असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. वनविभागाच्यावतीने पशुपालकांना शासननिर्णयानुसार मदत दिली जाणार असल्याचे चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी डी.के. मुनेश्वर यांनी सांगितले. मागील काही दिवसांमध्ये जंगलातील प्राण्यांनी गावाकडे धूम ठोकल्याने नागरिक चांगलेच दहशतीखाली आले आहेत. बागलिंगा, टेंब्रुसोंडा परिसरात बिबट्या व दोन तडशांचा मृत्यू झाला होता
आणि कॅमेरावर मारली झापड
चिखलदरा परिसरातील वनविभागासह व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी जंगलांमध्ये कॅमेरे लावण्यात आले आहेत.
दोन गुरांची शिकार करणाऱ्या वाघिणीचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दोन्ही गुरांची शिकार करताना कॅमेरे हा घटनाक्रम कैद करीत होते. शिकार झाल्यानंतर वाघाने झाडाला लावलेल्या त्या कॅमेºयावर चवताळून येऊन एक थप्पड लगावल्याचे कैद झाले. त्यामुळे फोटो काढला, तर वाघोबालासुद्धा राग येतो असेच म्हणावे लागेल. दरम्यान, वनकर्मचारी वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचे आदेश
वाघ इथे दिसला, तिथे दिसला, या विविध अफवांमुळे वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. शुक्रवारी वरूड परिसरासह काहींना गुरुवारी कारंजा बहिरम, करजगाव परिसरात वाघ दिसला असल्याचे सांगितले. परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांनी तत्काळ कर्मचाºयांसह स्वत: जाऊन पाहणी केली असता, काहीच आढळून आले नाही. वरूड परिसरात तडशाचे पगमार्क आढळल्याने वनकर्मचाºयांनी तपासणीअंती स्पष्ट केले. दरम्यान, वरूड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत लांबाडे यांनी अफवा पसरविणाºयाविरुद्ध कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.