जंगलात वाघांची घुसमट; स्थलांतर वाढले
By admin | Published: April 13, 2015 01:29 AM2015-04-13T01:29:04+5:302015-04-13T01:29:04+5:30
पाच ते १० वर्षांपूर्वी वाघांचे स्थलांतर फारच कमी व्हायचे. मात्र, अलिकडे वन्यपशुंना जंगलात पुरेसे सुरक्षित वातावणर मिळत
गणेश वासनिक ल्ल अमरावती
पाच ते १० वर्षांपूर्वी वाघांचे स्थलांतर फारच कमी व्हायचे. मात्र, अलिकडे वन्यपशुंना जंगलात पुरेसे सुरक्षित वातावणर मिळत नाही. शिवाय अन्न-पाण्याचाही अभाव असतो. परिणामी भक्ष्य आणि पाण्याच्या शोधार्थ ते जंगलांच्या सीमा ओलांडून बाहेर पडू लागले आहेत. अमरावतीच्या वडाळी वनपरिक्षेत्रात तब्बल ६० कि.मी.चा प्रवास करुन बोर, नागझिरा अभयारण्यातून आलेली वाघिणीही याच स्थलांतरण प्रक्रियेतून येथपर्यंत पोहोचली आहे. ही वाघिण ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्याने वनविभागाला आश्चर्याचा धक्का बसला. वाघांचे संरक्षण, संवर्धनासाठी व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली. परंतु वन्यपशुंना पाणी, शिकार करण्याचे स्वातंत्र्य हिरावले.
वनविभाग अनभिज्ञ
व्याघ्र प्रकल्पातून पाणी, शिकारीच्या शोधार्थ वाघ जंगलाबाहेर पडत असताना या प्रकारापासून वनविभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. साधारणपणे तीन ते आठ वयोगटातील नर वाघ विविध कारणांनी २५ ते ३० कि.मी. च्या परिघात फिरतो. नर वाघाच्या तुलनेत वाघीण ही त्यापेक्षा कमी प्रवास करते. मात्र, पट्टेदार वाघिणीने तब्बल ६० कि.मी.चा धोकादायक प्रवास करुन स्थलांतर केल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
४० वर्षांनंतरही व्याघ्र प्रकल्पात पाणी, भक्ष्याची टंचाई
वाघांचे संरक्षण, संवर्धनासाठी देशभरात व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. येथे वाघांना मुक्त संचार, सुरक्षित जगता यावे, हा उद्देश होता. मात्र, ४० वर्षांनंतरही वन्यपशुंना पाणी, शिकारीच्या शोधार्थ जंगलाबाहेर पडावे लागत असल्याचे चित्र आहे. उन्हाळा सुरु होताच व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाणी टंचाई भासू लागली आहे. जंगलात हरणांची संख्या कमी झाल्याने भक्ष्य शोधण्यासाठी वाघाला जीवावर बेतणारी कसरत करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात भूकबळीने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती.
वन अधिकाऱ्यांमध्ये ‘कम्युनिकेशन गॅप’
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी विदर्भात ताडोबा, पेंच, मेळघाट, नागझिरा हे व्याघ्र प्रकल्प आहेत. यात ताडोबा, पेंचमध्ये सर्वाधिक वाघ आपल्या सीमेतून दुसऱ्या सीमेत गेल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, वाघ दुसऱ्या हद्दीत गेल्यानंतरही याबाबत माहिती देणे किंवा जाणून घेण्याची तसदी देखील वनअधिकाऱ्यांनी घेतली नाही. खरे तर बेपत्ता वाघांची शोधमोहीम राबवून इंत्यभूत माहिती जाणून घेणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. परंतु वनअधिकाऱ्यांमध्ये ‘कम्युनिकेशन गॅप’ असल्याने जंगलातून वाघांचे राजरोसपणे स्थलांतर होत आहे.
वडाळी वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघीण आली आहे. ही वाघीण कोठून आली असावी याचा कसून शोध घेतला जात आहे. प्राप्त छायाचित्रानुसार ही वाघीण बोर, नागझिरा येथून आली असावी, असा अंदाज आहे. ती सुरक्षित राहावी यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- नीनू सोमराज
उपवनसंरक्षक, अमरावती.