‘त्या’ वाघाने केली म्हशीची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:15 PM2018-10-29T23:15:25+5:302018-10-29T23:15:47+5:30
दोन दिवसांपासून मोर्शी तालुक्यात तळ ठोकून असलेल्या नरभक्षक वाघाने रविवारी रात्री ९:३० दरम्यान पिंपळखुटा मोठा येथील सतीश देशमुख यांच्या म्हशीचे पिलू (वगार) ठार केले. धामणगाव, तिवसा तालुक्यात ५ दिवस धुमाकूळ घातल्यानंतर त्या वाघाने मोर्शी परिसरात प्रवेश केला. त्यामुळे नारिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. त्याच्या मागावर वनविभाग पाळत ठेवून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : दोन दिवसांपासून मोर्शी तालुक्यात तळ ठोकून असलेल्या नरभक्षक वाघाने रविवारी रात्री ९:३० दरम्यान पिंपळखुटा मोठा येथील सतीश देशमुख यांच्या म्हशीचे पिलू (वगार) ठार केले. धामणगाव, तिवसा तालुक्यात ५ दिवस धुमाकूळ घातल्यानंतर त्या वाघाने मोर्शी परिसरात प्रवेश केला. त्यामुळे नारिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. त्याच्या मागावर वनविभाग पाळत ठेवून आहे.
मोशी तालुक्यातील तळणी गावालगतच्या स्मशानभूमीजवळ प्रशांत सातंगे (रा. पिंपळखुटा मोठा) यांना रविवारी रात्री १०:३० च्या सुमारास वाघ दिसला होता. सोमवारी मोर्शी शहरालगत असलेल्या येरला मार्गे तालुक्यातील चिंचोली गवळी येथे सकाळी ९:३० वाजता तो काही नागरिकांना दिसल्याची माहिती मिळाली. चिंचोली गवळी येथील अनिल एकोतखाणे यांच्या मालकीच्या म्हशीला जखमी केल्याचे त्यांनी यांनी वनविभागाला सोमवारी दुपारी कळविले.
नरभक्षक वाघ हा येथून धारूड मार्गे नळा- मानी परिक्षेत्रातील सातपुडा पर्वतातील जंगलाकडे भरकण्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. मागील आठ दिवसांपासून या वाघाने चांगलेच जेरीस आणल्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये त्याची भीती कायम आहे. पुन्हा मानवसंहार होऊ नये, यासाठी वनविभागाची चमू त्या वाघाच्या मागावर आहेत. सलग तीन दिवस त्याच्या हालचालीवर सूक्ष्म लक्ष ठेवले जाईल, अशी माहिती सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. धामणगाव, तिवसा व मोर्शी अशा तीन तालुक्यात भ्रमंती करणाऱ्या या नरभक्षक वाघाची इत्थंभूत माहिती वन्यजीव विभागाला पाठविण्यात आली आहे.