वाघ, बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांची तृष्णातृप्तीसाठी भटकंती

By गणेश वासनिक | Published: May 6, 2024 12:31 PM2024-05-06T12:31:20+5:302024-05-06T12:38:18+5:30

Amravati : तापमान उच्चांकाकडे; व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यांकडे मात्र दुर्लक्ष

Tigers, leopards and other wild animals wandering to satisfy their thirst | वाघ, बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांची तृष्णातृप्तीसाठी भटकंती

Tigers, leopards and other wild animals wandering to satisfy their thirst

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
विदर्भात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचे चटके तापदायक ठरू लागले आहेत. दुसरीकडे व्याघ्र प्रकल्प अथवा जंगलात वाघ, बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांना तृष्णातृप्तीसाठी भटकंती करावी लागत आहे.

दिल्ली येथील राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने महिन्यातच यंदा जानेवारी वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी सूक्ष्म नियोजन करण्याबाबत निर्देश दिले होते. विशेषतः विदर्भात पारा सर्वाधिक राहत असल्याने व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी पाणवठ्यांची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, विदर्भात एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी पावसाने नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्यांमध्ये मुबलक पाणी होते. तथापि, मे महिना सुरू होताच व्याघ्र प्रकल्पांसह प्रादेशिक विभागाच्या जंगल क्षेत्रातील पाणवठ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. एकीकडे सूर्य आग ओकू लागला असताना, जंगल क्षेत्रातील ओढे, नाले, पाणवठ्यांमध्ये पाणी नसेल, तर वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी काय हाल होत असतील, याचा वनाधिकाऱ्यांनी विचार करणे काळाची गरज झाली आहे. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यांसंदर्भात राज्याच्या वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता, मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो, असे म्हणत उत्तर देणे टाळले, हे विशेष.


टँकरने पाणीपुरवठा खरंच होतो का?
व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यात पाणी समस्या उद्भवल्यास प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांचे आहेत. मात्र, व्याघ्र प्रकल्प वा जंगल क्षेत्रातील पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची तृष्णातृप्ती भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो का, याची तपासणी केल्यास बरेच घबाड बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात लिटमस पेपर नाही
पाणवठ्यात विष प्रयोगाच्या तपासणीसाठी वन कर्मचाऱ्यांना लिटमस पेपरचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना, अकोट, गुगामल, मेळघाट या चार वन्यजीव विभागांतील वन कर्मचाऱ्यांना पाणवठ्याच्या तपासणीसाठी लिटमस पेपर मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पाणवठ्यांवर तस्करांनी विषप्रयोग केल्यास वाघाच्या हत्येची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे. वन्यजीव विभागातील कर्मचारी हतबल झाले असून, लिटमस पेपर नाही, पोशाख आणि संरक्षणासाठी शस्त्रे नाहीत, अशी माहिती आहे.

 

Web Title: Tigers, leopards and other wild animals wandering to satisfy their thirst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.