मेळघाटात वाघाची कातडी जप्त; तीन वाघांची शिकार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 11:55 IST2019-01-04T11:53:01+5:302019-01-04T11:55:28+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री परतवाडा-चिखलदरा मार्गावर भिलखेडा फाट्यानजीक वाघाच्या कातडीसह आठ जणांना शिताफीने ताब्यात घेतले.

मेळघाटात वाघाची कातडी जप्त; तीन वाघांची शिकार?
लोकमत न्यूज नेटवर्क
अनिल कडू/
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री परतवाडा-चिखलदरा मार्गावर भिलखेडा फाट्यानजीक वाघाच्या कातडीसह आठ जणांना शिताफीने ताब्यात घेतले. सहा आरोपींची वनकोठडी अचलपूर न्यायालयातून वनविभागाने मिळविली. आरोपींपैकी काही जण मध्यप्रदेशातील मांजरी कापडी येथील रहिवासी आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांकडे वाघाचे तीन कातडे नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, गिरगुटी येथील अधिकाऱ्यांनी सापळा रचला. मोबाइलवरून ३० लाखांत सौदा ठरविल्यानंतर पुढे आलेल्या आरोपींना पकडण्यात आले. पूर्व मेळघाट वनविभागाच्या वनअधिकाऱ्यांचीही यात मदत घेण्यात आली. या संपूर्ण कारवाईत व्याघ्र प्रकल्पाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची भूमिका उल्लेखनीय राहिली.
नव्याने वाघाची शिकार?
वाघाची कातडी मेळघाटात पकडण्यात आली असली तरी ती गिरगुटी प्रकरणातील नाही. यामुळे आणखी एका वाघाच्या हत्येची भर पडल्याची शंका व्यक्त होत आहे. मेळघाटात सहापेक्षा अधिक वाघांच्या शिकारी झाल्या, तर व्याघ्र प्रकल्पक्षेत्रात तीनहून अधिक वाघ मारले गेल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर व्याघ्र अधिकारी मौन आहेत.
पूर्व मेळघाट वनविभाग असंवेदनशील
पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत अंजनगाव वनपरिक्षेत्रात सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार झाल्याचे आरोपीच्या बयानावरून स्पष्ट झाले असले तरी केवळ एक गुन्हा नोंदविण्यात आला. २० ते २५ आरोपींच्या चौकशीनंतर चौकशी थांबविली.
आधी हाडे, आता कातडी
मेळघाटातील व्याघ्र हत्येच्या अनुषंगाने आधी वाघाची हाडे, तर आता कातडी व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांच्या हाती लागली. व्याघ्र प्रकल्पांतर्गत चिखलदरा वनपरिक्षेत्रात चिरापाटी, लाइनबल्डा भागातही वाघाच्या शिकारी झाल्या आहेत. चिरापाटी येथील व्याघ्र हत्येसंदर्भात चौकशी अधिकाऱ्यांनी हाडे प्रयोगशाळेकडे पाठविली आहेत. लाइनबल्डा भागातील व्याघ्र हत्येत मात्र अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही.
स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी, वाघांची सुरक्षा धोक्यात
मेळघाटातील वाघांची सुरक्षा धोक्यात आली आहे. शिकारी स्थानिक असल्याचे व्याघ्र अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मेळघाटातील व्याघ्र हत्येची चौकशी वरिष्ठ स्तरावरून स्वतंत्र यंत्रणेकडून होणे गरजेचे आहे.
वाघाची कातडी जप्त केली असून, अन्य आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. सहा आरोपींना अटक करून त्यांची वनकोठडी मिळविली आहे.
- लक्ष्मण आवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिखलदरा