विदर्भातील वाघांचे सह्याद्रीत होणार स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:07 PM2020-06-30T17:07:34+5:302020-06-30T17:09:47+5:30
आता विदर्भातून आठ वाघ स्थलांतर होणार असल्याने सह्याद्रीच्या वन्यसंपदेत भर पडेल, यात दुमत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मानव- वन्यजीव संघर्षाची पार्श्वभूमी बघता विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्री अभयारण्यात स्थलांतर केले जाणार आहेत. त्यानुसार राज्याच्या वनविभागाने प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. यासंदर्भात वनमंत्री संजय राठोड यांच्याशी वनविभागाने चर्चा केली.
विदर्भात वाघांची संख्या वाढत चालली आहे. विशेषत: पेंच, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त वाघ असल्याने त्यांना संचारासाठी जंगलक्षेत्र अपुरे पडत आहे. परिणामी मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी उडत आहे. विदर्भातील वाघ हे उष्ण कटिबंधीय प्रदेशातील असून, त्यांना दऱ्या, डोंगराची सवय नाही. त्यातुलनेत सह्याद्री अभयारण्य हे थंड प्रदेशातील आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर असा मोठा भाग मुंबई पश्चिम वन्यजीव विभागाशी जोडण्यात आला आहे. भौगलिकदृष्ट्या दऱ्या, खोऱ्यांनी वेढलेला असून, हल्ली सह्याद्रीत पाच ते आठ वाघ असल्याची नोंद आहे. १५०० चौरस किमीचा हा प्रदेश निसर्गरम्य वातावरणाने नटलेल्या आहे. आता विदर्भातून आठ वाघ स्थलांतर होणार असल्याने सह्याद्रीच्या वन्यसंपदेत भर पडेल, यात दुमत नाही. सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करण्यापूर्वी त्या भागातील गावांच्या ग्रामपंचायतींची ना-हरकत घ्यावी लागणार आहे. प्रक्रिया फार किचकट असल्याने सहजतेने वाघांचे स्थलांतर करणे सोपे नाही, अशी वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.
तीन ते पाच वर्षाचे वाघ स्थलांतरणाची प्रक्रिया
विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात हल्ली क्षमतेपेक्षा जास्त ५० वाघ असल्याची माहिती आहे. त्यामुळे सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करताना ३ ते ५ वयोगटातील वाघांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. प्रथम एक किंवा दोन वाघ सह्याद्रीत स्थलांतर केल्यानंतर त्यांचे मॉनिटरिंग करण्यात येईल. हे वाघ सह्याद्रीत रमले की नाही, या निरीक्षणाअंती पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
वनसचिव मुख्यमंत्र्यांना देणार प्रस्ताव
विदर्भातील वाघांचे स्थलांतर करण्याबाबतचा प्रस्ताव वनसचिव हे राज्य वन मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविला जाणार आहे. त्यापश्चात व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्णत्वास येईल. सर्वोच्च न्यायालयालासुद्धा वाघांच्या स्थलांतरणाची माहिती द्यावी लागणार आहे.
वनमंत्र्यांशी वाघांच्या स्थलांतरणाबाबत चर्चा झालेली आहे. राज्य वन मंडळात याविषयी लवकरच मंथन होणार आहे. वाघांच्या स्थलांतरणासाठी अन्य पर्यायदेखील आहेत.
- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव), नागपूर.