स्कूल बसचालक-मालकांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:16+5:302021-04-16T04:12:16+5:30
आर्थिक विवंचनेतून कोंडी; अनेकांनी बदलला व्यवसाय फोटो - स्कूल बसचा कॅरीकॅचर चांदूर बाजार : गेल्या १४ महिन्यांपासून स्कूल बंद ...
आर्थिक विवंचनेतून कोंडी; अनेकांनी बदलला व्यवसाय
फोटो - स्कूल बसचा कॅरीकॅचर
चांदूर बाजार : गेल्या १४ महिन्यांपासून स्कूल बंद असल्यामुळे निगडित व्यवसाय ठप्प झाले आहेत. या ठप्प पडलेल्या व्यवसायाचा सर्वाधिक फटका स्कूल बसचालक-मालकांना बसला आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे आव्हान स्वीकारून काहींनी उपजीविकेसाठी व्यवसायच बदलला आहे.
२२ मार्च २०२० पासून देशात कोरोनाचे संकट घोंगवत आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर करून सर्वच व्यवसाय बंद केले होते. अशात शाळा-महाविद्यालयसुद्धा एक वर्षांपेक्षा जास्त काळापासून बंद आहेत. या शाळा बंद असल्याने शाळेवर आधारित अनेक व्यवसायसुद्धा ठप्प झाले आहे. अशातच शाळेवर आधारित स्कूल बस सेवासुद्धा आहे. त्याचा मोठा फटका स्कूल बसचालक-मालकांना बसला आहे. एका वर्षभरापासून स्थिती पूर्वपदावर आलेली नसल्याने स्कूल बसमालक-चालक यांची दुरवस्था झाली आहे. आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळा मोठ्या प्रमाणात असून, या शाळांमधील बाहेरगावातील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी साधारणपणे ४५ ते ५० स्कूल बस आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, सर्व शाळांचा अभ्यासक्रम केवळ ऑनलाइन सुरू आहे. यामुळे स्कूल बस गेल्या एक वर्षापासून जागेवरच थांबलेल्या आहेत. यामुळे बस मालक व चालक दोघांचे आर्थिक उत्पन्न बंद आहे. अनेकांनी बस फायनान्सवर घेतल्या आहेत. यामुळे उत्पन्न बंद असले तरी कर्जाचा हप्ता दरमहा भरावाच लागतो. आपले वाहन फायनान्स कंपनीने घेऊन जाऊ नये, यासाठी काही बसमालक खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन ईएमआय भरत आहेत. अनेकांनी जवळील मौल्यवान वस्तू गहाण ठेवून कर्जाचे हप्ते भरले आहेत. अशात एक छदामही उत्पन्न नसताना कर्ज फेडण्यासाठी आणखी कर्जाचा डोंगर बसमालकांवर होत आहे.
यावर्षीदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यावेळी राज्य शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केले. हीच स्थिती वारंवार उद्भवत असल्याने शाळा सुरू होण्याची आशा संपुष्टात आल्या आहेत. यामुळे अनेक स्कूल बसचालक-मालक आपला व्यवसाय बदलून तसेच आपली वाहने कवडीमोल भावात विकून अन्य व्यवसायाकडे वळू लागले आहेत. लाखो रुपये खर्च करून खरीदी केलेल्या स्कूल बस या आता त्यांच्यासाठी पांढरा हत्ती ठरू लागल्या आहेत.
----------
दोन कोट येत आहेत.