पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:14+5:302021-06-16T04:17:14+5:30
अंजनगाव सुर्जी : कोरोनाकाळात सफाई कामगार राबत असले तरी सफाई कंत्राटदाराकडून वेळेवर पगार न दिला गेल्याने त्यत्च्यासह कुटुंबावर उपासमारीची ...
अंजनगाव सुर्जी : कोरोनाकाळात सफाई कामगार राबत असले तरी सफाई कंत्राटदाराकडून वेळेवर पगार न दिला गेल्याने त्यत्च्यासह कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. परिणामी अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी काम बंदचा इशारा दिला आहे.
वेतनाबाबत कंत्राटदाराकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. सफाई कामगारांची ईपीएफची कपात झालेली रक्कमसुद्धा खात्यात पूर्णपणे जमा झाली नाही. सर्व कंत्राटी कामगारांचे पगार दोन दिवसांत न झाल्यास व ईपीएफचा प्रश्न निकाली न काढल्यास १८ जूनपासून शहरातील काम बंद करू. आंदोलनकाळातील पूर्ण दिवसाची मजुरी ही कंत्राटदाराला द्यावी लागेल व नुकसानास जबाबदार राहावे लागेल, असे निवेदन मुख्यधिकारी सुमेध अलोने, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांना मंगळवारी देण्यात आले. याप्रसंगी पंकज धुळे यांच्यासह सर्व कंत्राटी कर्मचारी हजर होते.
दरम्यान, कंत्राटदाराशी त्वरित पत्रव्यवहार करून कामगारांचे पगार देण्यासाठी सूचित करतो तसेच ईपीएफबाबतही नावांची यादी देताच ते काम मार्गी लावतो, असे मुख्यधिकारी सुमेध अलोने यांनी सांगितले.