राज्यात टॅंकरवारी सुरूच; ३,२९१ गाववाडे तहानलेलीच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 03:32 PM2018-06-12T15:32:54+5:302018-06-12T15:32:54+5:30
मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
अमरावती : मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जूनच्या तिस-या आठवड्यात राज्यात सर्वदूर पाऊस झाल्यानंतर ही परिस्थिती पालटण्याचे संकेत आहेत. तथापि, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परिस्थिती आटोक्यात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
गतवर्षी १२ जूनला १,७९८ गावे आणि ४,२८१ गावांना १,६६६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. यंदा टँकरची संख्या वाढली असली तरी टंचाईग्रस्त गाववाड्यांच्या संख्येमध्ये कपात झाली आहे.
कोकणातील पाच जिल्ह्यांतील २२७ गावे व ६३० वाड्यांमध्ये १०५ टँकरने, नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील ३१६ गावे व ३५८ वाड्यांमध्ये २६४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे विभागातील ४३० गाववाड्यांमध्ये ७५ टँकर, औरंगाबाद विभागातील ९५३ गाववाड्यांमध्ये सर्वाधिक ९६२ टँकरने, तर नागपूर विभागातील ४१ गावांमध्ये ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. अमरावती विभागातील ३३६ गावांमध्ये ३३० टँकरने पाणी पुरविले जात आहे. अर्थात राज्यातील १,७८५ गावे व १,५०६ वाड्यांमध्ये १९९ शासकीय टँकर व १,५७८ खासगी अशा १७७७ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही आकडेवारी ११ जूनपर्यंतची आहे.
१९.०२ टक्के उपयुक्त जलसाठा
राज्यातील ३,२४६ जलाशयांमध्ये १२ जूनअखेर केवळ १९.०२ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. त्यात अमरावती प्रदेशातील एकूण ४४३ प्रकल्पांमध्ये १६.३४, कोकणातील १७५ प्रकल्पांमध्ये ४०.३४, नागपूरमधील ३८५ प्रकल्पांमध्ये ११.३३, नाशिकमधील ५६१ प्रकल्पांमध्ये १९.६६, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये १७.२९ टक्के, तर मराठवाड्यातील ९५७ प्रकल्पांमध्ये केवळ १८.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.