मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या दिल्या टिप्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2017 12:12 AM2017-07-13T00:12:58+5:302017-07-13T00:12:58+5:30
मानव- वन्यजीव संघर्ष टाळणे, वन्यजीवांचे संरक्षण आणि वन्यप्राणी स्थलांतर रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, ....
रेस्क्यू आॅपरेशन पथक कार्यशाळा : वन्यजीवांचे संरक्षण,स्थलांतरविषयी मागदर्शन
अमरावती : मानव- वन्यजीव संघर्ष टाळणे, वन्यजीवांचे संरक्षण आणि वन्यप्राणी स्थलांतर रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, उपाययोजना आदींविषयी रेस्क्यू आॅपरेशन पथकाला तज्ञांकडून टिप्स देण्यात आल्या आहेत. मानव-वन्यजीव संघर्ष टाळताना रेस्क्यू आॅपरेशन पथकातीेल चमुने सुरक्षित कसे राहावे, याविषयी मार्गदर्शन देण्यात आले.
येथील वनविभागाच्या कुलाढाप संकुलात रेस्क्यू आॅपरेशन पथकाच्या आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा मंगळवारी समारोप झाला. उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा पार पडली. अमरावती, मेळघाट, नागपूर, यवतमाळ व बुलडाणा येथील रेस्कयू आॅपरेशन पथकाची चमू उपस्थित होती. या दोन दिवसीय कार्यशाळेत कार्मिक विभागाचे के. सिन्हा यांनी वन्यजीवांचे स्थलांतर, सामाजिक वनीकरणाचे रवींद्र वानखडे यांनी रानडुकराचे राहणीमान, सवयी, मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी माहिती दिली. व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी नरभक्षी वनप्राण्यांपासून बचाव करताना घ्यावयाची काळजी, राजू मैथ्यू यांनी अद्ययावत रायफल चालविणे, हाताळणे आणि वन्यजीवांचे पगमार्कवरुन नोंदी घेतांना ते वन्यप्राणी कोणते आदींबाबत मार्गदर्शन केले. वन्यजीव संरक्षक राघवेंद्र नांदे यांनी सापांची काळजी, वन्यजीवांचे संरक्षण करण्याविषयी मार्गदर्शन केले. रेस्क्यू आॅपरेशन पथकाची निर्मिती ही वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी झाली असल्याने या चमुला बारीकसारीक माहिती मिळावी, यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
वनविभागाच्या पुढाकाराने रेस्क्यू आॅपरेशन पथकाचे दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. एकूण ४० जवानांना वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
- हेमंत मीणा
उपवनसंरक्षक, अमरावती.