पटसंख्या वाढविण्यासाठी आयुक्तांच्या मुख्याध्यापकांना टिप्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:09 AM2021-07-05T04:09:47+5:302021-07-05T04:09:47+5:30
अमरावती : महापालिका शाळेतील पटसंख्या वाढविण्यासोबतच त्यांचा कोरोना संसर्गापासून करावयाच्या बचावासाठी आयुक्त प्रशांत रोडे यांनी सर्व मुख्याध्यापकांना महत्त्वाच्या टिप्स ...
अमरावती : महापालिका शाळेतील पटसंख्या वाढविण्यासोबतच त्यांचा कोरोना संसर्गापासून करावयाच्या बचावासाठी आयुक्त प्रशांत रोडे यांनी सर्व मुख्याध्यापकांना महत्त्वाच्या टिप्स दिल्या. एकही बालक शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षक मित्र’ पद्धत अवलंबवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
महापालिकेत सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी अब्दुल राजिक यांच्यासह शाळांचे निरीक्षक उपस्थित होते. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे पुढे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी शिक्षकावर आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची शहरी आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी करून घ्यावी. ज्या शाळेची पटसंख्या कमी आहे. त्या शाळांनी पटसंख्या कशी वाढणार, या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महापालिका शाळेतील विद्यार्थी सर्वसामान्य कुटूंबातील आाहे. त्यांची शैक्षणिक प्रगती होणे समाजासाठी महत्त्वाचे आहे. याची शिक्षकांवर मोठी जबाबदारी आहे. जे शिक्षक आपली जबाबदारी पार पाडणार नाहीत, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याची तंबी आयुक्तांनी दिली.
बॉक्स
शिक्षकांनी व्हावे तंत्रस्नेही
सध्याच्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीनुसार शिक्षकांनी स्वत:मध्ये बदल करणे महत्त्वाचे आहे. आगामी काळाची गरज लक्षात घेता शिक्षकांनी तंत्रस्नेही व्हावे. यासाठी महापालिकेच्या कार्यशाळादेखील होणार आहेत. ज्या शाळेचे कार्य सर्वोत्कृष्ट असेल, त्या शाळेला सत्कार करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.