तूर केंद्रांचा पुन्हा दगा
By admin | Published: June 13, 2017 12:07 AM2017-06-13T00:07:50+5:302017-06-13T00:07:50+5:30
बाजार हस्तक्षेप योजनेची मुदत १० जून रोजी संपुष्टात आल्यानंतर अद्यापही केंद्राने मुदतवाढ दिलेली नाही.
मुदतवाढ नाही : टोकन दिलेली चार लाख क्ंिवटल खरेदी बाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बाजार हस्तक्षेप योजनेची मुदत १० जून रोजी संपुष्टात आल्यानंतर अद्यापही केंद्राने मुदतवाढ दिलेली नाही. शासनाने पुन्हा दगा दिल्याने टोकन दिलेल्या किमान १९ हजार शेतकऱ्यांची चार लाख क्विंटल तुरीची खरेदी व्हायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
जिल्ह्यात १० मे पासून पीएसएस योजनेव्दारा तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या कोट्याची तूर २६ मे रोजी पूर्ण झाल्याने जिल्ह्यासह राज्यातील सर्व तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आली. त्यामुळे विहीत कालावधीत राज्य शासनाव्दारा बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात आली. बाजार समित्यांच्या आवारात उघड्यावर परंतु टोकन देण्यात आलेल्या तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र ही मुदतदेखील १० जून रोजी संपल्याने ज्या केंद्रावर तूर खरेदी व मोजणी बाकी होती त्या तुरीची प्रथम खरेदी करण्यात आली. सोमवारपर्यंत ही बाकी राहिलेली तूर खरेदी करण्यात आल्यानंतर यंत्रणा असलेल्या डीएमओव्दारा सर्व केंद्रावरील तुरीचा हिशेब जुळवणूक करण्यात येत आहे. तसेच केंद्रावरील तूर गोदामात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र टोकन दिलेल्या १९ हजार शेतकऱ्यांच्या चार लाख क्विंटल तुरीच्या खरेदीविषयी कोणतेच आदेश प्राप्त झाले नसल्यामुळे खरिपाच्या पेरणीच्या काळात शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
सर्व केंद्रावर ३१ मे पर्यत नोंद झालेल्या तुरीची खरेदी करण्यात आली.सध्या हिशोब प्रक्रीया सुरू आहे.टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी शासनादेशाची प्रतीक्षा सुरू आहे.
- अशोक देशमुख,
जिल्हा मार्केटींग अधिकारी