तूर खरेदीत अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 12:14 AM2017-06-18T00:14:18+5:302017-06-18T00:14:18+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर (नाफेड) अनियमितता असल्याची तक्रार करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडची तक्रार : सचिव, संचालकावर कारवाईची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर (नाफेड) अनियमितता असल्याची तक्रार करण्यात आली. यानुसार गठित करण्यात आलेल्या चौकशी समितीने अहवाल सादर केला असून तूर खरेदी केंद्रावर मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले असून बाजार समिती संचालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
नाफेड केंद्रावर गैरव्यवहार होत असल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडने केली होती. या तक्रारीवरून शासकीय तूर खरेदी केंद्रावर सहायक निबंधक, सहकारी संस्था अंजनगाव सुर्जी यांनी चार तालुक्यांच्या सहा. निबंधकांची चौकशी समिती गठित करण्यात आली होती. चौकशीचा अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू केले होते. यामध्ये अंजनगाव सुर्जी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात तूर खरेदी करण्यात आली. मात्र, यात गैरव्यवहार होत असल्याची ओरड होत होती. परंतु बाजार समितीच्या कोणत्याच संचालकाने या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही. बाजार समितीवर धडक मोर्चा नेऊन आंदोलन केले. याची दखल घेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी आर. आर. यादव (सहा. निबंधक, मोर्शी), एस. ए. गुडधे (सहा. निबंधक, अंजनगाव), बी. एस. पारोसे (चांदूररेल्वे), एन. व्ही. केसकर (अचलपूर) अशा चार अधिकाऱ्यांची बाजार समिती अंजनगाव येथे शासकीय तूर खरेदी केंद्राची तपासणी व कार्यालयीन लेखाजोखाची तपासणी समिती गठित करण्यात आली. या समितीने आपला चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधक यांचेकडे सादर केला असून या अहवालामध्ये एकूण सोळा मुद्दा गंभीर त्रुट्या आढळून आल्या आहेत. याच अनुषंगाने चौकशीअंती कारवाई होण्याची शक्यता आहे.
टोकन वाटप तसेच आवक-जावक रजिस्टर व्यवस्थित लेखाजोखा ठेवणे ही सर्व जबाबदारी बाजार समिती सचिवाची असल्यामुळे आम्ही बाजार समितीच्या संचालकांना सचिव महोदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
- एस. ए. गुडधे,
सहा. निबंधक,
अंजनगाव सुर्जी