मुद्रांक शुल्काचे कोट्यवधी रूपये थकीत
By admin | Published: August 24, 2016 07:31 PM2016-08-24T19:31:56+5:302016-08-24T19:31:56+5:30
कापूस खरेदी, कच्चे सूत, तेलबिया, डाळी, शेअर खरेदी व विक्री, धातू आदी ९२ प्रकारच्या वस्तू, साहित्यावर मुद्रांक शुल्क वसूल करण्याची नियमावली आहे
सन २००७ पासून वसुली नाही : ९२ प्रकारच्या वस्तुंवर ‘स्टॅम्प ड्युटी’ आकारण्याचा निर्णय
गणेश वासनिक /अमरावती : कापूस खरेदी, कच्चे सूत, तेलबिया, डाळी, शेअर खरेदी व विक्री, धातू आदी ९२ प्रकारच्या वस्तू, साहित्यावर मुद्रांक शुल्क वसूल करण्याची नियमावली आहे. मात्र, सन- २००७ पासून राज्यात मुद्रांक शुल्क वसूल करण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. मुद्रांक शुल्कापोटी हजारो कोटी रूपये शासनकर्त्यांनी बुडित काढले असून दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तिजोरीत पैसा नसल्याचा कांगावा केला जात आहे.
कच्च्या मालापासून उत्पन्न मिळावे, यासाठी मुंबई मुद्रांक अधिनियम १९५८ अंतर्गत शेड्यूल १ आर्टिकल ५ ‘ए’ ते ‘एच’मध्ये १ एप्रिल २००५ रोजी सुधारणा करण्यात आली होती. त्यानुसार शेड्यूल १ आर्टिकल ५ ‘ए’मध्ये कापूस खरेदी, ‘बी’ मध्ये कच्चे सूत, ‘सी’ मध्ये सर्व प्रकारचे धातू, ‘डी’मध्ये सर्व प्रकारच्या तेलबिया, डाळी, ‘एफ’मध्ये शेअर खरेदीवर मुद्रांक शुल्क वसूल करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. हजार रूपयांमागे एक रुपया वसूल करण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु १ एप्रिल २००५ पासून बॉम्बे स्टॅम्प अॅक्ट १९५८ मध्ये सुधारणा करूनही शासनाने या कायद्याची अंमलबजावणी केली नाही.
त्यामुळे बड्या धेंडांना याचा लाभ मिळाला आहे. मुद्रांक शुल्क नियमित वसूल झाले असते तर राज्याच्या तिजोरीवर ताण आला नसता, हे वास्तव आहे. तसेच आर्टिकल ५ ‘एच’ प्रमाणे होर्डिंग्ज, पोस्टर, टिव्हीवरील जाहिरातीवरही मुद्रांक शुल्क वसूल करण्याचा नियम आहे. असे असताना या कायद्याची अंमलबजावणी करण्यात शासन कुचराई करीत आहे. मुद्रांक शुल्क प्रामाणिकपणे वसूल केले गेले तर ९२ प्रकारचे साहित्य, वस्तुंपासून किमान २ लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम वसूल होईल, असा दावा जाणकारांचा आहे.
मुद्रांक शुल्क वसुलीचा मुद्दा विधीमंडळातही गाजला
राज्यात मुद्रांक शुल्क वसुली होत नसल्याचा मुद्दा सन २००७ मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात गाजला होता. तारांकित प्रश्न मांडून भाजप-सेना सरकारात मंत्री असलेले सुभाष देसाई, सुधीर मुनगंटीवार, एकनाथराव खडसे यांनी तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांना जेरीस आणले होते. मात्र, त्यावेळी आमदार आणि आता मंत्री म्हणून कारभार चालविणारे थकीत मुद्रांक शुल्क वसूल करणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे ६ हजार कोटी थकीत?
मुदांक शुल्काचे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे तब्बल ६ हजार कोटी रुपये थकीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. ६ हजार कोटी रुपये थकीत असल्याचा हाच मुद्दा नागपूर हिवाळी अधिवेशात एकनाथराव खडसे, सुभाष देसाई, सुधीर मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उचलला होता. तेव्हाचे विधी राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून दोन कोटी रूपये वसूल झाल्याची माहिती विधीमंडळाला दिली होतीे, हे विशेष.
मुद्रांक शुल्काचे १०० ते १५० कोटी रुपये थकीत असतील, असा अंदाज आहे. परंतु लवकरच वित्त विभागाची श्वेतपत्रिका जारी होणार असल्याने यातील वास्तव पुढे येईल. ज्यांच्याकडे मुद्रांक शुल्क थकीत आहे, अशांविरूद्ध वसुलीची कार्यवाही केली जाईल.
-सुधीर मुनगंटीवार,
वने व वित्तमंत्री, महाराष्ट्र