तंत्रज्ञानाअभावी संत्रा उत्पादकांची पिछेहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:14 AM2017-11-21T00:14:52+5:302017-11-21T00:15:47+5:30
वरुड-मोर्शी तालुक्याच्या भरभराटीला कारणीभूत ठरलेले संत्र्याचे पीक साठवणुकीसाठी शीतगृहे, प्रक्रिया केंद्र, संशोधन केंद्र व मार्गदर्शनाचा अभाव यामुळे आता फायदेशीर नसल्याचा अनुभव व्यक्त होत आहे.
वीरेंद्रकुमार जोगी ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : वरुड-मोर्शी तालुक्याच्या भरभराटीला कारणीभूत ठरलेले संत्र्याचे पीक साठवणुकीसाठी शीतगृहे, प्रक्रिया केंद्र, संशोधन केंद्र व मार्गदर्शनाचा अभाव यामुळे आता फायदेशीर नसल्याचा अनुभव व्यक्त होत आहे. उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊनदेखील उत्पादकांची पिछेहाट होत आहे.
वरूड-मोर्शी तालुक्यात सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रात मृग बहराचे उत्पादन घेतले जाते. एकट्या वरूड तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टरमध्ये संत्राबागा आहेत. त्यापैकी १६ हजार हेक्टरमध्ये फळ देणारी झाडे आहे. यामुळे उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. तथापि, वातावरणबदलामुळे रोगांचे वाढते प्रमाण व पाण्याचे दुर्भिक्ष्य या समस्या संत्रा उत्पादकांपुढे उभे ठाकले आहेत. ही स्थिती यापुढे कायम राहिल्यास उत्पादक अन्य पिकाकडे वळतील, असे मत व्यक्त होत आहे.
प्रयत्न पडले अपुरे
सन १९४५ पासून संत्र्याची लागवड सुरू झाली. १९६० साली शेंदूरजनाघाट येथे जिल्हा फळ बागायतदार रस उत्पादक सहकारी संस्थेच्या प्रकल्पाची कोनशिला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी रोवली. पाच वर्षांत फॅक्टरी कर्जबाजारी झाली. १९९२ साली वरूडमध्ये ‘सोपॅक’ फॅक्टरी लागली, तर १९९५ साली मोर्शी तालुक्यात मायवाडी यथे ‘नोगा’ प्रकल्प उभारला. हे दोन्ही प्रकल्प बंद पडले.
व्यापाऱ्यांची मक्तेदारी कायम
देशी-परदेशी बाजारपेठांमध्ये संत्र्याला मागणी मोठी आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. यामुळे संपूर्ण देशातून व्यापारी येथे ठाण मांडून संत्राबागा खरेदी करतात. बागायतदारांकडे पर्याय नसल्याने व्यापाऱ्यांची मक्तेदारी आहे. प्रक्रिया उद्योगाशिवाय यामध्ये फारसा बदल होणार नाही, असे मत बागायतदार व्यक्त करीत आहेत.