तिवसा, धामणगाव, चांदूर रेल्वे पंचायत समित्यांवर १५ तारखेपासून असणार प्रशासकराज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 11:00 AM2024-12-02T11:00:06+5:302024-12-02T11:02:19+5:30

निवडणुका लांबणीवर : सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकांचा ताबा

Tivasa, Dhamangaon, Chandur Railway Panchayat Committees will be administrated from 15th | तिवसा, धामणगाव, चांदूर रेल्वे पंचायत समित्यांवर १५ तारखेपासून असणार प्रशासकराज

Tivasa, Dhamangaon, Chandur Railway Panchayat Committees will be administrated from 15th

गजानन मोहोड 
लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
धामणगाव तालुक्यासाठी चांदूर रेल्वे व तिवसा तालुक्याचे विभाजन करण्यात आले. तेव्हापासून या तिन्ही तालुक्यांत पंचायत समित्यांच्या निवडणुका इतर पंचायत समित्यांसोबत न होता स्वतंत्रपणे होत आहेत. या तीनही पंचायत समित्यांचा कार्यकाळ १४ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. अद्याप प्रभागरचना, आरक्षण सोडत न झाल्याने या पंचायत समित्यांवर डिसेंबरपासून १५ प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. 


विद्यमान बीडीओ हेच पंचायत समितीचे प्रशासक राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. जिल्हा परिषदेचा कार्यकाल २० मार्च २०२२ पासून संपुष्टात आलेला आहे, तर चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, अमरावती अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, भातकुली व नांदगाव पंचायत समितीचा कार्यकाळही १३ मार्च २०२२ पासून संपुष्टात आला आहे. तेथेदेखील प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचे मुद्द्यावर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या पं. स.ची प्रभागरचना व आरक्षण प्रक्रिया आटोपली असतानाही आयोगाद्वारे निवडणूक कार्यक्रम लावण्यात आला नाही. परिणामी जिल्हा परिषदेसह ११ पंचायत समिती, मनपा व सर्व नगर परिषद व नगरपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित तीन पंचायत समित्यांमध्ये लोकनियुक्त पदाधिकारी होते. आता या ठिकाणीदेखील प्रशासकराज राहणार आहे. 


प्रभागरचना, आरक्षण सोडत झालेली नाही 
तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीची मुदत १४ डिसेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी प्रभागरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता. मात्र या तिन्ही तालुक्यांत आयोगाद्वारे ही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. त्यामुळे या पंचायत समित्यांच्या निवडणुका न होता प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.


एकत्रित निवडणूक होण्याची दाट शक्यता 
जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ५९ वरून ६६ पर्यंत करण्यात आल्याने पंचायत समितीची सदस्यसंख्या ११८ वरून १३२ झालेली आहे. आता लवकरच निर्णय होऊन न्यायालयीन प्रकरण निकाली निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे जि.प. व सर्व पंचायत समिती व काही दिवसांच्या फरकात नगर परिषद, नगरपंचायत व मनपाची निवडणूक होण्याची शक्यता असल्याची चर्चा प्रशासनात आहे.


प्रशासकांमुळे विधानपरिषदेची निवडणूक रखडली 
विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा कार्यकाळ २२ जून २०२४ ला संपुष्टात आलेला आहे. या मतदारसंघात सन २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत ४८८ मतदार होते. यंदा तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव पंचायत समिती वगळता सर्व स्थानिक संस्थांवर प्रशासक आहे. या सर्व ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत मतदार यादी होऊ शकत नाही. प्रशासकराजमुळे ही निवडणूक रखडली आहे. पं।स, चे फक्त सभापतीच यामध्ये मतदार आहेत.


या तारखेपासून प्रशासकराज 
जिल्हा परिषद : २० मार्च २०२२ १० 
पंचायत समिती : १३ मार्च २०२२ 
धारणी पंचायत समिती: २४ जून २०२२ 
तिवसा, चांदूर, धामणगाव : १४ डिसेंबर २०२४

Web Title: Tivasa, Dhamangaon, Chandur Railway Panchayat Committees will be administrated from 15th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.