तिवसा नगरपंचायतीचा ‘पंतप्रधान आवास योजने’त समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:44 PM2017-10-15T22:44:46+5:302017-10-15T22:45:16+5:30
जिल्ह्यातील अमरावती महापालिका व निवडक नगर परिषदांत पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येणार होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील अमरावती महापालिका व निवडक नगर परिषदांत पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येणार होती. यात नवनिर्मित नगर पंचायतीचा समावेश नव्हता. यासंदर्भात आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तिवसा नगरपंचायतीचा समावेश पीएम आवास योजनेत करण्यात आला आहे.
तिवस्याच्या नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी आ.यशोमती ठाकूर व तिवसा नगरपंचायतीचे अध्यक्ष राजकन्या खाकसे, उपाध्यक्ष व बांधकाम सभापती वैभव वानखडे, मुख्याधिकारी सचिन गाडे व सदस्यांनी सतत मागणी, व शासनदरबारी पाठपुरावा केला. सभेने ही योजना राबविण्याचा ठराव घेऊन अनुसूचित जातीसह इतर मागासवर्गीय वंचित लाभार्थ्यांना घरकूल मिळावा असा आग्रह धरला. त्यांच्या प्रयत्नामुळे इतरही नगर पंचायतीचा यात समावेश झाला आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना फायदा होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त करीत आ.ठाकूर यांचे आभार मानले.
पंतप्रधान आवास योजनेत तिवस्याचा समावेश व्हावा, यासाठी नगरपंचायतीने एकमताने ठराव मंजूर केला होता. नागरिकांना हक्काचे घरकूल मिळावे यासाठी शासनाकडे निरंतर पाठपुरावा केला. यामुळे तिवसा व अन्य नगर पंचायतींना योजनेचा लाभ मिळेल.
- यशोमती ठाकूर, आमदार