तिवसा, धामणगावात काँग्रेस, चांदूर रेल्वेत भाजपचा सभापती अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 04:12 PM2022-11-23T16:12:56+5:302022-11-23T16:13:39+5:30

पंचायत समितीत सभापतिपदाची निवडणुकीत काँग्रेसची बाजी; चांदूर रेल्वेत नाट्यमय घडामोडी

Tiwasa, Congress in Dhamangaon, BJP President unopposed in Chandur Railway | तिवसा, धामणगावात काँग्रेस, चांदूर रेल्वेत भाजपचा सभापती अविरोध

तिवसा, धामणगावात काँग्रेस, चांदूर रेल्वेत भाजपचा सभापती अविरोध

Next

अमरावती : जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांच्या सभापतिपदांसाठी मंगळवारी विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये तिवसा व धामणगाव रेल्वे येथे काँग्रेस व चांदूर रेल्वे येथे भाजप विजयी झाला.

तिन्ही पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक सन २०१९ मध्ये झाली होती. त्यानंतर अडीच वर्षांचा कालावधी २१ जून रोजी संपुष्टात आला तरी सभापतिपदाचे आरक्षण निश्चित झाले नव्हते. १५ जूनला उपसभापतिपदाची निवडणूक घेण्यात येऊन त्यांना सभापतिपदाचा प्रभार देण्यात आला होता. आता आरक्षण काढण्यात आल्याने २२ नोव्हेंबरला उर्वरित कालावधीसाठी सभापतिपदासाठी विशेष सभा संबंधित तहसीलदारांच्या उपस्थितीत घेण्यात आली. तिन्ही ठिकाणी सभापतिपदावरील व्यक्ती अविरोध निवडली गेली असली तरी चांदूर रेल्वे येथे नाट्यमय घडामोेडी झाल्या. येथे काँग्रेसची साथ सोडून ऐनवेळी भाजपत प्रवेश करणाऱ्या सदस्याला सभापती करण्यात आले.

तिवसा : कल्पना दिवे अविरोध 

तिवसा : सभापतिपदासाठी मंगळवारी पंचायत समिती सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. तळेगाव ठाकूर गणाच्या सदस्य कल्पना किशोर दिवे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली. माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात पुन्हा तिवसा पंचायत समितीवर काँग्रेसने बाजी मारली. येथे चार महिन्यांपासून उपसभापती रोशनी पुनसे यांच्याकडे पदाचा प्रभार होता. कल्पना दिवे यांच्या निवडीची घोषणा तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी वैभव फरतारे यांनी केली. यावेळी सहकारातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब दिवे, किशोर दिवे, नगराध्यक्ष योगेश वानखडे, संदीप आमले, रवींद्र हांडे, वैभव वानखडे, मुकुंद पुनसे, उपसभापती रोशनी पुनसे, पंचायत समिती सदस्य शिल्पा हांडे, शरद वानखडे, अब्दुल सत्तार, नीलेश खुळे आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

धामणगाव रेल्वे : बेबी उईके सभापती

धामणगाव रेल्वे : मंगळवारी झालेल्या विशेष सभेत काँग्रेसच्या बेबी सुधाकर उईके यांची पंचायत समिती सभापतिपदी अविरोध निवड झाली. आठ सदस्यीय पंचायत समितीमध्ये काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व आहे. हे पद सर्वसाधारण (स्त्री) प्रवर्गाकरिता राखीव होते. बेबी उईके यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. यावेळी वीरेंद्र जगताप, श्रीकांत गावंडे, नितीन दगडकर, सुरेश निमकर, उपसभापती जयश्री शेलोकार, माजी सभापती महादेवराव समोसे, माजी उपसभापती माधुरी दुधे, पंचायत समिती सदस्य जयश्री ढोले, शुभम भोंगे, नितीन कनोजिया, मोहन पाटील घुसलीकर, संजय तायडे, पंकज वानखडे, मंगेश बोबडे, अविनाश मांडवगणे, सतीश हजारे, विशाल रोकडे, आशिष शिंदे, शुभम चौबे आदी उपस्थित होते.

चांदूर रेल्वे : प्रशांत भेंडे बिनविरोध

चांदूर रेल्वे : पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत येथे ऐनवेळी मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेल्या प्रशांत भेंडे यांची अविरोध निवड करण्यात आली.

पंचायत समितीमध्ये भाजपचे चार, तर काँग्रेसचे दोन सदस्य आहेत. यापैकी काँग्रेसचे प्रशांत भेंडे यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपची सदस्यसंख्या पाच झाली. सभेला भेंडेंसह सरिता श्याम देशमुख, प्रतिभा धनंजय डांगे, शुभांगी अमोल खंडारे हे सदस्य उपस्थित होते. याशिवाय भाजपच्या श्रद्धा वऱ्हाडे व काँग्रेसचे अमोल होले अनुपस्थित होते. पीठासीन अधिकारी तहसीलदार राजेंद्र इंगळे, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय खारकर होते. आमदार प्रताप अडसड, रावसाहेब रिठे, पंचायत समिती माजी सभापती तथा सदस्या सरिता देशमुख, प्रतिभा डांगे, बंडू मुंधडा, राजू चौधरी, संजय पुनसे, गजानन जुनघरे, समीर भेंडे, रवि उपाध्याय, संदीप सोळंके, बच्चू वानरे, डॉ. हेमंत जाधव, पप्पू गुल्हाने, अजय हजारे, प्रावीण्य देशमुख, प्रशांत देशमुख, पप्पू भालेराव, सुलभा खंडार, अमोल अडसड, बाबाराव वऱ्हाडे, विलास कोल्हे आदींनी विजयाचा जल्लोष केला.

Web Title: Tiwasa, Congress in Dhamangaon, BJP President unopposed in Chandur Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.